होमपेज › Nashik › नाशिकच्या 1100 गाळेधारकांवर अखेर कोसळणार जप्तीची कुर्‍हाड 

नाशिकच्या 1100 गाळेधारकांवर अखेर कोसळणार जप्तीची कुर्‍हाड 

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 2:03AMनाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या विविध कर विभागाने सुरू केलेल्या जप्‍ती कारवाईस स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात गेलेल्या गाळेधारकांचा दावा फेटाळत मनपाची कारवाई योग्यच असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे मनपाच्या कारवाईला बळ मिळाले असून, येत्या काही दिवसांत 1100 गाळेधारकांवर जप्‍तीची कुर्‍हाड कोसळणार आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करत असलेल्या गाळेधारकांकडे मनपाची 43 कोटींची थकबाकी आहे. मार्चअखेर ही वसुली व्हावी यासाठी मनपाने संबंधित 1100 गाळेधारकांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही गाळेधारकांनी थकबाकी भरली नाही की नोटीसला उत्तरही दिले नाही. यानंतर मनपाने पुन्हा संबंधितांना अंतिम नोटीस बजावली होती. या नोटीसनंतरही थकबाकी न भरल्याने विविध कर विभागाने थेट जप्‍तीचे आदेश देत थकबाकी भरण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.

या मुदतीस आता 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. यामुळे येत्या 15 दिवसांत 1100 गाळे जप्‍त होणार हे निश्‍चित करण्यात आले आहे. या भीतीपोटीच मनपाच्या कारवाईला स्थगिती देण्यात यावी, यासाठी यशवंत मंडई येथील हर्ष किरण कटारिया यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने कटारिया यांचा दावा बरखास्त करत कारवाईला स्थगिती देता येणार नाही, असे सांगून मनपाने दिलेली नोटीस कायदेशीर असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने दिलेला आदेश हा मनपाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे थकबाकीदार असलेल्या इतर गाळेधारकांना ही चपराक आहे. 

Tags : Nashik, suspension, seizure, action, initiated, various, tax, departments, Municipal Corporation,