Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Nashik › देवनदी जोडप्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू

देवनदी जोडप्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 11:52PMसिन्‍नर : प्रतिनिधी

राज्य शासनाने गारगाई-अप्पर वैतरणा-कडवा-देवनदी लिंग नदीजोड प्रकल्पास काही महिन्यांपूर्वी तत्वत: मान्यता दिली आहे. सिन्‍नर तालुक्यातील पाणी वितरणाबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या  प्रकल्पाचा डीआरपी अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल पुढील वर्षी मार्च  पर्यंत पुर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

कोनांबे शिवारातील प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, हैदराबाद येथील  राष्ट्रीय जलविकास अभिकरणाचे मुख्य अभियंता श्रीनिवास, अधीक्षक अभियंता डी. आर. शर्मा, कार्यकारी अभियंता पी. बी. रामाराजू, अधीक्षक अभियंता एन. जी. राव, जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य जगनपाटील भाबड, सरपंच नामदेव शिंदे, सरपंच संजय डावरे, संजय सानप, अशोक डावरे,  रामनाथ पावसे आदी उपस्थित होते. अभिकरणाच्या अभियंत्यांनी शिवडे घाटातील भौगोलिक स्थितीची पाहणी केली. 

तालुका पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने यापुर्वी शेतीसाठी पाणी योजना नव्हती. त्यामुळे नदीजोड प्रकल्प केंद्र व राज्य सरकारकडे सुचवण्यात आला होता. दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर त्यास तत्वत: मान्यता मिळाली. प्रकल्प अहवालास येणार्‍या 23 कोटी रुपये खर्चासही राज्य सराकारने तत्वत: मान्यता दिली. त्यामुळे तालुक्यासाठी 7 हजार दशलक्ष घनफूट इतके पाणी उपलब्ध होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

कडवा  धरणापर्यंत प्रकल्प अहवाल तयार झाला असून सिन्‍नर तालुक्यातील वितरण व पाईपद्वारे जोडण्यात येणारा नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. कोनांबे शिवारात सिन्‍नर नगरपरिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राजवळ पाणी लिफ्ट करण्यासाठी चार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. त्या अनुषगांने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. 

नदीजोड प्रकल्प  कार्यान्वित झाल्यानंतर तालुक्याला मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होणार असल्याचे आमदार वाजे यांनी स्पष्ट केले. तर 2100 दलघफू पाणी देवनदीत, 2 हजार 600 दलघफू पाणी सिन्‍नर व माळेगाव औद्योगिक वसाहतीस, तर 1 हजार 500 दलघफू पाणी भोजापूर कालव्यास सोडण्यात येणार आहे. 800 दलघफू पाणी शिर्डीसाठी प्रस्तावित असल्याचे जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.