होमपेज › Nashik › सायने जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाची किमया

विद्यार्थ्याचे वय दोन वर्षांनी वाढविले

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 07 2018 11:59PMनाशिक : प्रतिनिधी

विद्यार्थ्याच्या शाळेच्या दाखल्यावर  त्याचे वय दोन वर्षांनी वाढविण्याची किमया सायने ब्रु.(ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने घडवून आणल्याचा प्रकार शिक्षण समितीच्या मासिक सभेत उजेडात आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सभापती यतींद्र पगार यांनी दिले आहेत.

पगार यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज झाले. आढावा घेत असताना शिक्षकांची 11,509 पदे भरण्यात आली असून, 1147 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली. विज्ञान पदवीधर शिक्षकांची पदे भरण्यात येणार असून, सेवाज्येष्ठतेसंदर्भात हरकती असल्यास चालू महिनाअखेर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. देवळा येथील जिल्हा परिषदेच्या  शाळेसंदर्भात सदस्या नूतन आहेर यांनी तक्रार केली. चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना पगार यांनी केली.

चालू शैक्षणिक वर्षात नेमक्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून गणवेश देण्यात आले, यासंदर्भातील माहिती पुढील सभेत सादर करण्यात येणार आहे. वाढोडा शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आली. पण, ग्रामस्थांनी ही शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असल्याचे गटशिक्षणाधिकार्‍यांनी सांगितल्यावर पुढील सभेत विषय ठेवण्याची सूचना करण्यात आली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य खरेदी करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून ग्रामपंचायतींना पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. हाताणे (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्रजीच्या वर्गाला ग्रामस्थांनीच विरोध केल्याचे सभेत सांगण्यात आले. त्यामुळे इंग्रजीची सक्ती नको, अशी सूचना करण्यात आली. 

एकीकडे इंग्रजी माध्यमासाठी धडपड केली जात असताना या ग्रामस्थांनी केलेली मागणी अनाकलनीय ठरली आहे. दुसरीकडे पटसंख्येअभावी बंद केलेली शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी झालेली मागणी याच सभेत दिसून आल्याने विरोधाभास समोर आला आहे.