Tue, Jul 16, 2019 12:00होमपेज › Nashik › मनपाचे सहायक अभियंता पाटील यांचा शोध सुरूच

मनपाचे सहायक अभियंता पाटील यांचा शोध सुरूच

Published On: May 28 2018 1:40AM | Last Updated: May 27 2018 10:54PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेतील कामकाजाच्या ताणतणावामुळे बेपत्ता झालेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांचा 24 तास उलटूनही शोध लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी गंगापूर पोलिसांनी तीन पथके नेमली असून, शहरातील सीसीटीव्हींची पाहणी केली जात आहे. दरम्यान, पाटील यांच्या बेपत्ता होण्यावरून सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे. 

रवींद्र प्रेमनाथ पाटील (42, रा. डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड) हे शनिवारी सकाळपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी शीतल यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली असून, त्यात कामाच्या तणावामुळे पाटील नैराश्यात असल्याचे दिसून येते. पाटील बेपत्ता होऊन 30 तासांहून अधिकचा कालावधी उलटला असून, त्यांचा शोध लागत नाही. त्यांचा मोबाइलही घरीच सापडल्याने पोलिसांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी शहरातील सर्व महत्त्वाची ठिकाणांची तपासणी करून पाटील यांचा शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाही. रविवारी (दि.27) शोधमोहीम वाढवण्यात आली आहे. तीन पथके नेमली आहेत.

एका पथकामार्फत गोदावरी नदीचा संपूर्ण परिसर तपासला जात आहे, तर दुसर्‍या पथकाद्वारे शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानकांची पाहणी करून तेथील सीसीटीव्हीचीही पाहणी केली जात आहे. त्याचप्रमाणे शहरासह जिल्ह्यातील व इतर रेल्वेस्थानकांवर तसेच तेथील सीसीटीव्हींची पाहणी केली जात आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, मुंबई तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांना त्यांचे छायाचित्र पाठवून स्थानिक पोलिसांनाही पाटील यांचा शोध घेण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पाटील यांच्या बेपत्ता होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नसल्याचे रविवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले होते.