Sat, Jul 20, 2019 10:59होमपेज › Nashik › याद्या पडताळणीत टाळाटाळ केल्यास बीएलओंचे निलंबन

याद्या पडताळणीत टाळाटाळ केल्यास बीएलओंचे निलंबन

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 07 2018 10:57PMनाशिक : प्रतिनिधी

घरोघरी जाऊन बीएलओंमार्फत (बूथ लेव्हल ऑफिसर) मतदारयाद्या पडताळणीची कामे तातडीने पूर्ण करावी. कामचुकारपणा करणार्‍या बीएलओंवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी अश्‍वनीकुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग तयारीला लागला आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अश्‍वनीकुमार यांनी शनिवारी (दि.7) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील अधिकार्‍यांशी संवाद साधत या कामाचा आढावा घेतला.  

मतदारयाद्या शुद्धीकरणात नवमतदार नोंदणीवर अधिकाधिक भर द्यावा. त्यासाठी बीएलओंना घरोघरी भेटी देण्याच्या सूचना कराव्यात. दुबार मतदार तसेच मयत व्यक्तींची नावे यादीतून वगळावी. मतदारांच्या नाव व पत्त्यात बदल असल्यास तातडीने त्यात दुरुस्ती करून घ्यावी. दरम्यान, निवडणुकीच्या कामात टाळाटाळ करणार्‍या बीएलओंबाबत यावेळी आयोगाने कडक भूमिका घेतल्याचे अश्‍वनीकुमार यांनी सांगितले. जिल्ह्यात असे बीएलओ आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असेही आदेश यावेळी अश्‍वनीकुमार यांनी दिले.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत तेथील सोयीसुविधांची पाहणी करावी. तसेच या भेटीत केंद्रांवर काही उणिवा आढळल्यास तत्काळ त्या दूर कराव्यात, अशा सूचनाही अश्‍वनीकुमार यांनी यावेळी दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सवेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार गणेश राठोड आदी उपस्थित होते.