Fri, Mar 22, 2019 08:14होमपेज › Nashik › सुळे उजव्या कालव्याच्या कामाची चौकशी सुरू

सुळे उजव्या कालव्याच्या कामाची चौकशी सुरू

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 11:26PMकळवण : वार्ताहर

तालुक्यात गाजत आलेल्या सिंचन घोटाळ्याप्रक्रणी सुळे उजव्या कालव्याच्या कामाची चौकशी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.19) सकाळी 11 वाजेपासून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी संदीप जाधव यांनी पुनद धरणापासून थेट पाटविहीर  शिवारातील कालव्याची पाहणी करून मंत्री महोदयांना माहिती दिली. तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. 

दैनिक पुढारीने सुळे उजवा कालव्याच्या कामासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची दाखल घेऊन आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली शिस्टमंडळाने  चौकशीची मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत शनिवारी  ना. महाजन यांचे स्वीय सचिव  संदीप जाधव  यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शिष्टमंडळ, ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी  यांच्याशी चर्चा करुन लवकरच कालव्याच्या त्रुटी दूर करुन येत्या पावसाळ्यात पूरपाणी पाटविहीरपर्यंत पोहचवण्याची सूचना संबधित पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांना दिली. त्याचप्रमाणे कालव्याच्या झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून अधिकारी व ठेकेदाराक्डून खर्च केलेली रक्कम वसूल करण्यात येऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

यासाठी  स्वतंत्र चौकशी समिती नेमणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.  शेतकर्‍यांना कालवा कागदावर पूर्ण झाल्याने शासनाच्या पाण्यासंबंधी कोणत्याच योजनांचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे मार्च ते जून महिन्यात  भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली पुनद खोर्‍यातील शेतकर्‍यांनी मुंबई येेथे ना. महाजन यांना कालव्याच्या चौकशी करण्याचे निवेदन दिले होते. त्याचवेळी ना. महाजन यांनी चौकशीचे आदेश दिले होते. पाहणीप्रसंगी छावाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार, सामाजिक कार्यकर्ते राकेश हिरे, बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, बाबाजी जाधव, बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विनोद भालेराव, बबन वाघ, मोतीराम जगताप, बापू गायकवाड, भाजपचे आदिवासी विकास आघाडीचे सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, बाळासाहेब जाधव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. व्ही. मुसळे, सहाय्यक अभियंता एन. डी. बाविस्कर, उपअभियंता एल. एस. कट्यारे, शाखा अभियंता लोहकरे आदी उपस्थित होते.

सुळे उजव्या कालव्याच्या कामाच्यावेळी हलगर्जीपणाकरून या कालव्याच्या कामातील भ्र्रष्टाचारात शासकीय अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांचा सहभाग आहे. संबंधित तत्कालीन  शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना तत्काळ निलंबित करावे. कालव्यावर झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. जे अधिकारी सेवानिवृत्त झाले असतील त्यांची पेन्शन बंद करावी. तसेच ते काम करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. - प्रदीप पगार, तालुकाध्यक्ष, छावा संघटना 

सुळे उजवा कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी गरज पडल्यास मोठे आंदोलन करण्यात छेडण्यात येईल. तसेच कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.  - जे. पी. गावित, आमदार

भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या व अपूर्णावस्थेत असलेल्या सुळे उजवा कालवा होऊनही शेतकर्‍यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते आहे. धरणातील पाणी अद्यापपर्यंत राखीव झालेले नाही. धरणातील शिल्लक पाण्यावर इतर तालुके पाण्याची मागणी करून पाण्यावर हक्क प्रस्थापित करीत आहेत. शासनाने या कालव्याचे पाणी राखीव करून घोषित करावे. तसेच कालव्याच्या कामात दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी. - विनोद भालेराव,उपतालुकाप्रमुख, शिवसेना