Wed, Apr 24, 2019 11:28होमपेज › Nashik › नांदगाव : पोलीस निरीक्षक बशीर शेख सोशल मीडियावर ट्रोल

चिमुकल्याजवळ खरी पिस्तूल!

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 11:29PMनांदगाव : प्रतिनिधी 

एखाद्या विद्यार्थ्याने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे ही गोष्ट अभिनंदनीय असली तरी, थेट पोलीस ठाण्यात जाऊन खरीखुरी पिस्तूल हातात घेत ट्रिगरवर हात ठेवून सोशल मीडियावरून चमकोगिरी करणे हा प्रकार चमत्कारिक असल्याची भावना नांदगावकरांनी व्यक्‍त केली आहे.

त्याचे झालेअसे की, ‘खरीखुरी पिस्तूल हाताळण्याचे  स्वप्न आज पूर्ण’ या मथळ्याखाली एक पोस्ट आणि नांदगावचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या समवेतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही पिस्तूल खरी असून, खुद्द पोलीस निरीक्षकांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर असल्याचे सांगण्यात येते. मात्र, सोशल मीडियावर पोलीस निरीक्षकच यामुळे ट्रोल झाले आहेत. ही पोस्ट म्हणजे शेख यांनी एक लहानग्या मुलाजवळ खरी पिस्तूल हाताळण्यास दिली असून, ती पिस्तूल  तो दोन्ही हातांनी रोखताना दिसतो.

फोटोतील ठिकाण नांदगाव पोलीस स्टेशनमधील शेख यांची केबिनच आहे. मुलाच्या आग्रहास्तव ही पिस्तूल त्याच्या हातात देण्यात आली. मात्र, एका लहान मुलाजवळ एका जबाबदार अधिकार्‍याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर देणे म्हणजे ‘हात दाखवून अवलक्षण’ आणल्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जर पिस्तूलमध्ये बुलेट असतील तर? त्या मुलाने  ट्रिगर दाबला असता तर? त्याचप्रमाणे त्याच्या हातातून एखाद्याने ती पिस्तूल घेऊन पोबारा केला असता किंवा त्या मुलानेच कुणाच्या अंगावर पिस्तूल रोखत अनावधानाने ट्रिगर दाबले गेले असते तर भयंकर दुर्घटना घडली असती.  

खरी पिस्तूल लांबूनही दाखवता येणे शक्य होते. अशी ‘सोशल’ चर्चा शहरात नेटिझन्समध्ये होत आहे. जबाबदार अधिकार्‍याने असे कृत्य करणे हे नांदगावकरांना रुचलेले नसून, याबाबत वरिष्ठ कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.