Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Nashik › शौचालयांची उद्दिष्टपूर्ती; निधीची मात्र प्रतीक्षाच

शौचालयांची उद्दिष्टपूर्ती; निधीची मात्र प्रतीक्षाच

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 11:35PMनाशिक : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानातून जिल्ह्यात शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, दुसरीकडे सरकारी पातळीवर निधी उपलब्ध करून देण्यास हात आखडता घेण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. 68 हजार शौचालयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी 72 कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारने स्वच्छतेच्या विषयाला प्राधान्य दिले असून, स्वच्छ भारत अभियानातून वैयक्तिक शौचालय बांधण्यास कुटुंबांना प्रवृत्त करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खातेप्रमुखाला कामाला लावण्यात आले होते. संबंधितांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शौचालय बांधण्याच्या कामाला गती दिली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय असल्याची नोंद पाणी व स्वच्छता विभागात करण्यात आली आहे. 

दुसरीकडे शौचालय बांधणार्‍या कुटुंबाला प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी मात्र पैसेच नसल्याची बाब उजेडात आली. 68,472 कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 72 कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी 2017-18 मधील असून, सरकारने या कामी उदासीनता दाखविली असल्याचे दिसून येत आहे. वारंवार मागणी नोंदवूनही निधी मिळत नसल्याने अधिकारीही वैतागले आहेत. त्यातच अनुदानासंदर्भात ग्रामस्थांकडून विचारणा होत असून, अधिकारी कात्रीत सापडले आहेत. निधी नसल्याने ग्रामस्थांची समजूत काढताना अधिकार्‍यांची दमछाक होत आहे. तूर्त तरी निधीसाठी प्रतीक्षा केली आहे.