Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Nashik › आसूड कडाडला... बळीराजा संपावर!

आसूड कडाडला... बळीराजा संपावर!

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 1) देशभरातील शेतकर्‍यांनी संप पुकारला. नाशिक जिल्ह्यातील शेतकरीही संपात सहभागी होत रस्त्यावर उतरले. येवला, नांदगाव आणि सिन्नरमध्ये शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतून देत सरकारचा निषेध नोंदविला. 

काही ठिकाणी शेतकर्‍यांनी रस्त्यातच भाजीपाला फेकून दिला. संपामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्यासह इतर शेतमालाची आवक रोडावली. परिणामी कोट्यवधींचे व्यवहार ठप्प पडले. दरम्यान, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतानाच प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नांदगाव, मालेगाव, चांदवड व सिन्‍नर तालुक्यातील कसत  असलेल्या वन जमिनीधारकांचे दावे त्वरित मंजूर करावे. तसेच, मंजूर वनजमिनी दावेधारकांची जमिनीची मोजणी करण्यात यावी.

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही व नांदगावमधील खादगाव येथील गायरान जमीन कसत असलेल्यांच्या नावावर करावी. मंजूर केलेले व मोजणी झालेल्या वन जमिनीधारकांची नावे 7/12 उतार्‍यावर नोंदणी करा. कसत असलेल्या वनजमिनींवर वनविभागाकडून सुरू असलेली चारी व खड्डे खोदकाम त्वरित बंद करण्यात यावे. वन जमिनीधारक ऊसतोडणी व वीटभट्टी कामासाठी बाहेरगावी जातात. त्यामुळे त्यांचे वनजमिनीचे दावे दाखल करून घ्यावे. दुधाला सरकारने ठरवून दिलेल्या 27 रुपयेप्रमाणे हमीभाव व फरकाची रक्कम त्वरित देण्यात यावी. नांदगाव व चांदवड तालुक्याला नारपारचे पाणी मांजरपाडा एक मधून समन्यायी पद्धतीने देण्यात यावे, आदी मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आल्या.

केंद्र सरकारने चीनचा कांदा, मोजांबिकची तूर, पाकिस्तानातून साखर तसेच डाळी आयात करून देशांतर्गत शेतमालाचे भाव पाडले. या घटनेचा यावेळी किसान सभेतर्फे निषेध करण्यात आला. आंदोलनात किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू देसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, जिप सदस्या अमृता पवार, भास्कर शिंदे, देवीदास भोपळे, विजय दराडे, नितीन रोटे-पाटील, लक्ष्मी परदेशी यांच्यासह विविध संस्था व संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.