Mon, Jun 17, 2019 02:19होमपेज › Nashik › चांदवडच्या नगराध्यक्षांचे पद धोक्यात

चांदवडच्या नगराध्यक्षांचे पद धोक्यात

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 11:15PMनाशिक : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने मुदतीत जातप्रमाणपत्र सादर न केलेल्या लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण  आदेश शुक्रवारी (दि.24) दिला आहे. या आदेशामुळे चांदवडच्या नगराध्यक्षा रेखा गवळी यांचे पद धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील उर्वरित नगरपालिकातील नऊ नगरसेवकांवरही पद रद्दची टांगती तलवार आहे.  

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना सहा महिन्यांच्या आत जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. कोल्हापूरला 19 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निकालाविरोधात संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दिलासा देण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने या सदस्यांची याचिका फेटाळत मुदतीत प्रमाणपत्र न देणार्‍यांची पदे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा फटका जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमधील नऊ नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे.

या नगरसेवकांमध्ये सटाणा नगरपालिकेचे सर्वाधिक चार सदस्य आहेत. यात भारती सूर्यवंशी, मन्सुरी शमा आरिफ, बाळू बागूल व लता सोनवणे यांचा समावेश आहे. बागूल व सोनवणे यांनी मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासनाकडे प्रमाणपत्र सादर केले. सिन्नर नगरपालिकेचे रखमा रूपेश मुठे व ज्योती वामने यांचेही पद रद्द होऊ शकते. दरम्यान, मनमाडच्या शेख यास्मीन रफीक यांनी केवळ प्रमाणपत्राची पोच पावती जमा केली असून, येवल्याच्या पुष्पा गायकवाड यांनी प्रमाणपत्रच दिलेले नाही. तर नांदगावच्या चांदनी खरोटे यांनीही केवळ पावती प्रशासनाकडे जमा केली आहे. जिल्हा नगरपालिका शाखेतर्फे यापूर्वीच यासर्व सदस्यांचे प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत सदस्यांवरही गंडांतर

जिल्ह्यात 1365 ग्रामपंचायती आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ग्रामपंचायतीच्या सदस्यांनाही लागू आहे. त्यामुळे जिल्हा ग्रामपंचायत शाखेने आता पंधराही तहसीलदारांमार्फत त्या-त्या तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील किती सदस्यांनी प्रमाणपत्रे सादर केली नाही, याची माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. त्यामुळेच वेळेत प्रमाणपत्र सादर न केलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पदावरही गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे.