Sat, Jul 20, 2019 11:22होमपेज › Nashik › गणेश मंडळांच्या जागेवरून खडाजंगी होण्याची शक्यता

गणेश मंडळांच्या जागेवरून खडाजंगी होण्याची शक्यता

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 12:08AMनाशिक : प्रतिनिधी

बी. डी. भालेकर मैदानावर गणेश देखावे साकारण्यास मनपा आयुक्‍तांनी नकार दिल्यानंतर आता आयुक्‍तांनीच शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची आणि पदाधिकार्‍यांची आज (दि.31) महापालिकेत बैठक बोलविली आहे. यामुळे आता या बैठकीतून एकूणच शहरातील गणेशोत्सवाबाबत काय मार्ग निघतो, याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, गणेश मंडळांची बैठक घ्यावी, अशी सूचना महापौर रंजना भानसी यांनी आयुक्‍तांना पत्राद्वारे केली होती. 

भालेकर मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून अंबड आणि सातपूर औद्योगिक क्षेत्रातील काही बड्या कंपन्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक असे भव्य दिव्य देखावे साकारले जातात. तसेच, शहरातीलही काही गणेश मंडळांचे देखावे याठिकाणी असतात. त्यानुसार येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भालेकर मैदानावर गणेश आरास उभारण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यासाठी संबंधित गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे आयुक्‍तांकडे गेले होते. या भेटीत आयुक्‍तांनी कार्यकर्त्यांना परवानगी मिळणार नसल्याचे सांगून तपोवनाचा रस्ता दाखविला. त्यानंतर राजकीय पक्ष आणि गणेश मंडळांनीही भालेकर मैदानावरील परंपरा आम्ही खंडित होऊ देणार नाही, असा हट्ट धरत आंदोलनाचा इशारा दिला होता.

यावर मनपा प्रशासनाने मागील आठवड्यात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोलावून संबंधित विषय अधिक चिघळू नये यासाठी इदगाह मैदानाचा पर्याय सुचविला. परंतु, संबंधित ठिकाणी मस्जिद असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी हा पर्याय फेटाळून लावत तुम्ही जबाबदारी घेणार का असा प्रश्‍न प्रशासनाला केला. यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोलावून झालेली बैठकही निष्फळ ठरली. महापौर रंजना भानसी यांनी आयुक्‍तांना पत्र सादर करत बैठक बोलविण्याची सूचना केली होती.

त्यानुसार आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी आज (दि.31) सायंकाळी 5 वाजता मनपा मुख्यालयातील रेकॉर्ड रूम येथे बैठक बोलविली असून, त्यास गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मनपा पदाधिकारी आणि गटनेते, नगरसेवकांना आमंत्रित केले आहे. गणेशोत्सव आनंदी वातावरणात आणि शांततेत पार पडावा, असा बैठकीचा उद्देश आहे. परंतु, गणेशोत्सवापूर्वीच जागेच्या वादावरून शांतता भंग पावली आहे. यामुळे आता या बैठकीतून काय तोडगा निघतो यावरच सर्व काही अवलंबून आहे.