Mon, Nov 19, 2018 06:19होमपेज › Nashik › नाशिकची कपाट कोंडी फुटण्याची शक्यता

नाशिकची कपाट कोंडी फुटण्याची शक्यता

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 06 2018 11:34PMनाशिक : प्रतिनिधी 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील इमारतींना नऊ मीटरचा लाभ देण्यासाठी रस्तासन्मुख जागा सोडून ते रस्ते नऊ मीटर रुंदीकरणाच्या मांडलेल्या प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. नऊ मीटरच्या रस्त्यांसाठी जागा दिल्यास शहरातील कपाटाच्या प्रश्‍नात अडकलेल्या अडीच ते तीन हजार इमारतींचा अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे  मागील चार वर्षांपासून अडकलेला बांधकामातील कपाटाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

शासनाच्या अधिनियम कलम 210 नुसार महापालिका हद्दीतील दाट वस्ती क्षेत्राबाहेरील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सीमारेषा विहीत करून अशा खासगी जागा ताब्यात घेणे व त्याबाबतची कार्यवाही करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. आयुक्तांनी स्थायी समितीच्या बैठकीत नऊ मीटर रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडला. त्यावर स्थायी सदस्यांनी चर्चा करून त्यास मान्यता दिली. त्यामुळे शहरात नऊ मीटर रस्ते रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात ज्या ठिकाणी सहा ते साडेसात मीटरचे रस्ते आहेत. 

तेथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील इमारती अथवा प्लॉटधारकांची प्रत्येकी दीड मीटर जागा महापालिका 210 च्या प्रस्तावानुसार हस्तांतरित करेल. त्या बदल्यात इमारतींना टीडीआर अथवा जादा एफएसआय दिला जाईल. महापालिकेकडून नऊ मीटरच्या रस्त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना 1.80 इतका वाढीव एफएसआय दिला जातो. शहरातील बहुतांश कपाट प्रश्‍नात अडकलेल्या इमारतींना अधिकृत होण्यासाठी साधारणत: 1.60 वाढीव एफएसआयची गरज आहे. त्यांनी नऊ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिल्यास त्यांचा अनधिकृत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे कपाटप्रश्‍नी अडकलेल्या बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्याची अजून एक संधी प्राप्त झाली आहे. रस्ते रुंदीकरण झाल्याने शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

शासनाने दिलेल्या कम्पाउंडिंग स्किमनुसार अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी येत्या ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, सहा ते साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींनी नऊ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांना जादा एफएसआय दिला जाईल. बांधकाम व्यावसायिकांसाठी अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कपाटाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. तसेच, मागील दोन-तीन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रातील मरगळ दूर सरून या क्षेत्राला चालना 
मिळेल.

- तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका