Wed, May 22, 2019 15:18होमपेज › Nashik › ‘रासाका’ २६ जानेवारीपर्यंत सुरू होण्याची दाट शक्यता!

‘रासाका’ २६ जानेवारीपर्यंत सुरू होण्याची दाट शक्यता!

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:18PM

बुकमार्क करा
काकासाहेबनगर : वार्ताहर

‘रासाका’ अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना 26 जानेवारीपर्यंत सुरू होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार अनिल कदम यांनी विधानसभा अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग, औरंगाबादचे चेअरमन हरिभाऊ बागडे यांना रासाकाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात गळ घातली होती. त्यास ना. बागडे यांनी सहमती दर्शविल्याने ‘रासाका’त उर्वरित गळीत हंगाम सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

अनिल कदम यांनी रासाका कामगार संघटनेचे नेतृत्व करत रासाका गळीत हंगाम सुरू झाल्यास त्याचे फायदे ना. बागडे यांच्या लक्षात आणून दिले. तसेच, रासाका सुरू न झाल्यास अतिरिक्‍त उसाचा प्रश्‍न निर्माण होऊन सत्ताधारी पक्षाच्या वतीने आपणच अडचणीत येणार असल्याचे सांगितले तर कामगारांच्या वेतनाचा जटिल होत असलेला प्रश्‍न यातून जर मार्ग काढायचा असेल तर रासाका सुरू होणे गरजेचे असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

ना. बागडे यांनी छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाच्या वतीने पैठण येथील संत एकनाथ साखर कारखाना चालविणारे अतुल शुगर प्रा. लि.चे जी. डी. आरकडे यांच्या वतीने रासाका सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी रासाका कार्यस्थळावर रासाका सुरू करण्यासाठी कामगार, कामगार संघटना, ऊसतोडणी मजूर, ठेकेदार, ट्रकचालक-मालक संघटना, ऊस उत्पादक शेतकरी, छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाचे व्हा. चेअरमन दामोदर नवपुते, कार्यकारी संचालक दिगंबर बडदे आदींनी भेट दिली. तसेच, रासाकाचा गळीत हंगाम सुरू करण्याचे निर्देश देत मशिनरीचे काम युद्धपातळीवर करण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रासाका सुरू झाल्यास आमदार अनिल कदम यांचा नागरी सत्कार करण्याचा मानसही कामगारांनी व्यक्‍त केला आहे. याप्रसंगी रासाका कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे उपाध्यक्ष नेताजी वाघ यांनी कामगाराच्या अनेक बाबींचा ऊहापोह केला. यावेळी रासाका कामगार संघटनेचे अध्यक्ष बळवंत जाधव, उपाध्यक्ष नेताजी वाघ, मुख्य अभियंता आर. आर. वाघ, जनरल मॅनेजर पी. आर. जाधव, शेतकी अधिकारी लक्ष्मण ढोमसे, रासाका ट्रकचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विलास वाघ, सभासद बाळासाहेब वाघ उपस्थित होते.