Thu, Apr 18, 2019 16:08होमपेज › Nashik › महापालिकेत लवकरच जम्बो भरतीची शक्यता

महापालिकेत लवकरच जम्बो भरतीची शक्यता

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 15 2018 10:59PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेचा नवीन आकृतिबंध मंजुरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या सात दिवसात निर्णय घेतला जाईल, असे ठोस स्वरूपाचे आश्‍वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी महापालिका पदाधिकार्‍यांना दिले आहे. यामुळे येत्या काळात महापालिकेत जम्बो भरती निघण्याची शक्यता आहे. सध्या मनपात विविध पदांच्या 7090 इतक्या जागा मंजूर असून, पैकी 1823 इतक्या जागा रिक्‍त आहेत. 14 हजार 746 इतक्या जागांचा नवीन आकृतीबंध मनपाने शासनास सादर केला आहे. त्यामुळे 7656 इतक्या जागा नव्याने निर्माण होणार आहेत. 

महापालिकेतील विविध प्रकल्प आणि कामांच्या माहितीचा गुरूवारी (दि.15) आढावा घेतला. त्याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. आकृतीबंधातील जागांना मंजूरी मिळाल्यास आस्थापनेवरील एकूण पदांची संख्या 7090 वरून 14 हजार 746 इतकी होणार आहे. मनपाने सेवा प्रवेश नियमांचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. या प्रस्तावानुसार शासनाने मनपाला नव्याने आकृतिबंध तयार करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार महापालिकेने आस्थापनेवरील गट अ ते गट ड मधील मंजूर पदांचा व नव्याने आवश्यक असलेल्या पदांचा आढावा घेत सहा महिन्यांपूर्वीच सुधारीत आकृतिबंध शासनाकडे पाठविला आहे. सध्या मनपाच्या आस्थापनेवर विविध संवर्गांमध्ये एकूण 7090 मंजूर पदे आहेत. यामध्ये अ गटातील 139, ब- 83, क- 2199 व ड गटातील 4669 पदांचा समावेश आहे. नव्याने तयार केलेल्या आकृतिबंधात अ गटात 275, ब गटामध्ये 109, क गटात 2427 तर ड गटामध्ये 4,845 नवीन पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. माध्यमिक शिक्षण विभागासाठी सद्यस्थितीत 148 पदे मंजूर आहेत. त्यात आणखी 50 पदांची भर नव्या आकृतीबंधानुसार पडणार आहे. 

महिला बालकल्याण विभागासाठी प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, यांची दोन, खतप्रकल्प विभागासाठी स्टेशन ऑपरेटरचे 1, विशेष भूमी संपादन अधिकारी विशेष घटक 9, नागरी भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलनासाठी पोलिसांची 78 पदे, वाहतूक नियोजन कक्षासाठी 91, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एक, खत प्रकल्पासाठी विविध 13, वाहन चालक 98, बुस्टर पंपींग स्टेशनवर कार्यरत कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्यासाठी 47, तर आरसीएच प्रकल्पातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मनपा सेवेत सामावून घेण्यासाठी 35 पदे नव्याने निर्माण करण्याची शासनाकडे आकृतीबंधाच्या माध्यमातून केली आहे.  महापालिकेत वाहतूक नियोजन कक्ष, नागरी पोलिस ठाणे, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी फेरीवाला कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष नव्याने निर्माण केला जाणार आहे. यासाठीही आकृतिबंधात नवीन पदांच्या निर्मितीसाठी तरतूद करण्यात आली आहे.