Tue, Apr 23, 2019 19:38होमपेज › Nashik › मनपाला २०० दशलक्ष लिटर पाण्याचा हिशेबच लागेना!

मनपाला २०० दशलक्ष लिटर पाण्याचा हिशेबच लागेना!

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:49PMनाशिक : प्रतिनिधी

शहराला दररोज 410 दशलक्ष लिटर होणार्‍या पाणीपुरवठ्यापैकी 44.50 टक्के पाण्याचा हिशेबच लागत नसल्याची धक्‍कादायक बाब महापालिकेने केलेल्या वॉटर ऑडिटमधून समोर आली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी मनपाला तब्बल 600 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर शहराला पाणीपुरवठा होऊनही नेमकं पाणी कुठं मुरतंय? याचा शोध मनपा घेणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

पाण्याचे लेखापरीक्षण करण्याचे काम मे. एनजेएस इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. संस्थेने मनपाच्या पाणीपुरवठ्याकडे अहवाल सादर केल्यानंतर तो स्मार्ट सिटी योजनेकडे सोपविण्यात आला आहे. लेखापरीक्षणासाठी संबंधित संस्थेने जीआयएस यंत्रणेच्या माध्यमातून सहा विभागांतील प्रत्येकी दोन जलकुंभ व त्या अंतर्गत येणार्‍या भागाचा अभ्यास केला.

यातील प्रत्येक जलकुंभाच्या ठिकाणच्या 20 टक्के नळजोडणीची माहिती घेतली. शहराला दररोज 410 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यात साडेतीन ते चार टक्के पाणी वाया जाते. तसेच मनपा इमारती, उद्याने व स्टॅण्ड पोस्टच्या ठिकाणी तीन टक्के इतका पाणीपुरवठा होत असून, ग्राहकांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यापैकी जवळपास 45 टक्के पाण्यावर बिलच आकारले जात नसल्याचा शोधही अहवाल तयार करणार्‍या संस्थेने लावला आहे.

पाणीपुरवठ्याच्या सर्व प्रक्रियेत थेट गळती होणार्‍या पाण्याचे प्रमाण 14.50 टक्के इतके आहे. त्याचबरोबर 44.50 टक्के पाण्याचा तर हिशेबच लागत नसल्याने मनपाला दरवर्षी पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वॉटर ऑडिट अहवालाबाबत 31 जानेवारीपर्यंत स्मार्ट सिटी कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाला उपाययोजना करण्याबाबत कळविण्यात येणार आहे.