Thu, Jul 18, 2019 13:08होमपेज › Nashik › डॉक्टरांनी वाचविले मॅरेथॉनमधील स्पर्धकाचे प्राण 

डॉक्टरांनी वाचविले मॅरेथॉनमधील स्पर्धकाचे प्राण 

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:12PMनाशिक : प्रतिनिधी

मुंबई येथे पार पडलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या अनेक डॉक्टर्सनी सहभाग नोंदवला. या दरम्यान एका तरुणाला जीवनदान देण्याची मोलाची भूमिकाही नाशिकच्या तीन डॉक्टरांनी बजावली. 

मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून  डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रशांत देवरे आणि डॉ.श्रीकांत उपासनी विश्रांती घेत असतानाच एक   तरुण  स्पर्धकाला अत्यवस्थ अवस्थेत आणल्याचे त्यांनी पाहिले. रुग्णाचे हृदयाचे ठोके अनियमित होते आणि श्‍वासोच्छवास देखील बंद होत होता. डॉक्टरांनी तत्काळ त्याच्या छातीवर दाब देऊन हृदय चालू करण्याचा आणि मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेतील  सीपीआर अर्थात कार्डियो पल्मोनरी रिसस्टीशनद्वारे उपचारास प्रारंभ  केला.

डॉ. वैभव पाटील यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. डॉ. प्रशांत देवरे यांनी श्‍वासनलिकेत नळी टाकली आणि डॉ. श्रीकांत उपासनी यांनी कृत्रिम श्‍वासोच्छवास सुरू केला. परंतु, हृदयाचे ठोके बंद होत होते. तेव्हा पेशंटला दोन कृत्रिम शॉक देण्यात आले. अखेर रुग्णाचे ठोके नियमित झाले आणि तिघांनी सुटकेचा निःश्‍वास  सोडला. तिघा डॉक्टरांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळेच रुग्णाचा जीव वाचविणे शक्य झाले. यात टाटा मुंबई मॅरेथॉनची संयोजक, मेडिकल टीम आणि रुग्णवाहिका यांचे सहकार्य लाभले. नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने  (आयएमए) डॉ. पाटील, डॉ. देवरे आणि डॉ. उपासनी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच मॅरेथॉन, सायकलिंगसारखे व्यायाम करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील, डॉ. देवरे आणि डॉ.उपासनी यांनी केले आहे.