धुळे : प्रतिनिधी
तापी नदी बॅरेजेसमुळे बारमाही झाली आहे. बुराई नदीवरील 34 बंधार्यांमुळे बुराई नदीही बारमाही होणार आहे. तापी-प्रकाशा-बुराई, सुलवाडे-जामफळ योजना कार्यान्वित झाल्यावर शिंदखेडा तालुक्यातील इंचन्इंच जमीन सिंचनाखाली येईल, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही प्रवाहित करण्यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर ना. रावल यांनी बुधवारपासून दुसाणे, येथून बुराई नदी पायी परिक्रमेस सुरुवात केली आहे. रेवाडी येथून परिक्रमेस सुरुवात झाली. सकाळी अकराच्या सुमारास परिक्रमेचे वाडी, ता. शिंदखेडा गावात आगमन झाले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जि. प. सदस्य कामराज निकम, वाडी गावाचे सरपंच अनिल गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे (शिरपूर), लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने, तहसीलदार सुदाम महाजन (शिंदखेडा) आदी उपस्थित होते.
ना. रावल म्हणाले, शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका ही ओळख पुसून काढावयाची आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांत काम करून परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. सिंचन, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, असे नियोजन केले आहे. तापी नदी बारमाही झाल्याने नदीकाठावरील गावात बागायती क्षेत्र वाढले आहे. तापी बुराई, सुलवाडे, जामफळ, उपसा सिंचन योजना, बुराई नदी माता ते पाया बारमाही झाल्यावर सिंचनाखालील क्षेत्र वाढेल. त्यामुळे या भागात शेतकरी केळी, ऊस यासारखे बागायती पिके घेऊ शकतील. राज्यातील सुमारे 82 टक्के क्षेत्र जिराईत आहे. ते वाढविण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आगामी पावसाळ्यात ग्रामस्थांनी प्रत्येकी एक याप्रमाणे रोपांची लागवड करावी. तसेच त्यांचे संगोपन करावे. वाडी गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी या महिन्यात बैठक आयोजित करून त्यांचे निरसन करावे, अशी सूचना केली. यावेेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’चा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले.
Tags : nashik, Shindkheda news, irrigation, Jayakumar Rawal,