Thu, Jun 27, 2019 11:53होमपेज › Nashik › शाईअभावी नोटा छपाईचा वेग मंदावला

शाईअभावी नोटा छपाईचा वेग मंदावला

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 1:36AMउपनगर : वार्ताहर

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने वीस आणि शंभराच्या नोटांची नवीन डिझाइन मंजूर न केल्यामुळे आणि इम्पोर्टेड शाई उपलब्ध होत नसल्याने नाशिकरोड सीएनपी प्रेसमध्ये नोटांची छपाई थांबल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच देशभरात चलनटंचाई निर्माण झाली असून, एटीएममध्येदेखील खडखडाट आहे.

दोनशे आणि पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी इम्पोर्टेड शाई उपलब्ध नसल्याने या नोटांचेही उत्पादन सध्या होत नाही, असे  समजते. या दोन्हींचा परिणाम देशातील नोटांच्या उपलब्धतेवर झाला आहे. जेलरोडच्या सीएनपी प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशेच्या नोटांची छपाई केली जाते. सर्व प्रकारच्या नोटांची मिळून दर दिवसाला चौदा ते अठरा दशलक्ष एवढ्या प्रचंड संख्येने छपाई केली जाते. यासाठी अडीच हजार कामगार सकाळी सातपासून तीन शिफ्टमध्ये काम करतात. सहा प्रकारांपैकी फक्त दहा आणि पन्नासच्या नोटांची छपाई सुरु आहे. सरकारने पन्नास आणि दोनशेच्या नव्या नोटा बाजारात आणल्या आहेत. त्याचप्रमाणे वीस आणि शंभराच्या नवीन नोटा चलनात आणल्या जाणार आहेत.

मात्र, वीस आणि शंभराच्या नोटांची 31 मार्चपर्यंतची ऑर्डर छापून झाली आहे. या दोन्ही नोटांचे नवीन डिझाइन अर्थमंत्रालयाकडून अजून मंजूर न झाल्याने त्यांची छपाई थांबली आहे. तर दोनशे आणि पाचशेच्या नोटांची छपाई दुसर्‍या देशातून येणार्‍या शाईअभावी थांबली आहे. सर्व मशीन्सवर दहा आणि पन्नास याच नोटांचे डिझाइन सध्या लावण्यात आले आहे.   सध्या फक्त दहा व पन्नासच्या नोटांचीच ऑर्डर असल्याने कामगारांना नवीन ऑर्डरची प्रतीक्षा आहे.

नोटाबंदीच्या काळात नाशिकरोड प्रेस कामगारांनी वर्षभर सुट्टी न घेता काम केल्यामुळेच देशाला नोटाबंदीची झळ पोहोचली नाही. नोटाबंदीत नाशिकरोड प्रेसच्या नोटा रस्ता, रेल्वेबरोबरच प्रथमच हवाईमार्गे देशभरात पोहचविण्यात आल्या. नोटांची रखडलेली छपाई हे जसे एक कारण आहे. तसेच उपलब्ध नोटांमध्येही व्यवहार सुरळीत होऊ शकतात. मात्र, बँकेतून काढलेल्या दोनशे, पाचशे व दोन हजाराच्या नोटा परत बँकेत भरणा केल्या जात नसल्याने एटीएममध्ये खडखडाट आहे.