Sat, Mar 23, 2019 12:27होमपेज › Nashik › आयुक्‍त मुंढेंच्या निर्णयाचा निवडणूक शाखेला फटका 

आयुक्‍त मुंढेंच्या निर्णयाचा निवडणूक शाखेला फटका 

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:44AMनाशिक : प्रतिनिधी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील 286 अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फटका जिल्हा निवडणूक शाखेला बसला आहे. यातील बहुतांश अंगणवाडी सेविकांकडे बीएलओंची (बूथ लेव्हल ऑफिसर) जबाबदारी होती. मात्र, सेवेतूनच त्यांना कमी केल्याने निवडणुकीचे पुढील काम करायचे कसे, असा प्रश्‍न निवडणूक शाखेतील अधिकार्‍यांना पडला आहे. 

तुकाराम मुंढे यांनी आयुक्‍तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात अधिकार्‍यापासून ते कर्मचार्‍यांपर्यंत कामात कसूर केलेल्यांवर निलंबनाची थेट कारवाई केली. त्यापुढे जात मुंढे यांनी शहरातील 286 अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच परिसरात दोन अंगणवाड्या, विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी, दोन अंगणवाड्यांमधील कमी अंतर, एकाच विद्यार्थ्यांची नावे दोन ठिकाणी नमूद असणे अशी विविध कारणे देत ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाचा थेट फटका आता जिल्हा निवडणूक शाखेला बसला आहे. 

शहरात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये मनपाच्या शाळांमधील शिक्षकांबरोबरच अंगणवाडी सेविकांची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली. 

एकट्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात 291 बीएलओ कार्यरत आहेत. त्यापैकी 129 बीएलओ या अंगणवाडी सेविका आहेत. मात्र, मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या एकाच मतदारसंघातील 76 अंगणवाडी सेविका घरी गेल्या आहेत. परिणामी, या अंगणवाडी सेविकांकडील दप्‍तर जमा करून घेण्याशिवाय निवडणूक शाखेला गत्यंतर उरलेले नाही. एका मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे. तर इतर तीन मतदारसंघांचा विचार न केलेलाच बरा. 

येत्या वर्षाच्या अखेरीस लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागला असून, मतदारयाद्यांचे शुद्धीकरण केले जात आहे. परंतु, आयुक्त मुंढेंच्या निर्णयामुळे शहरातील बीएलओंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळेच निवडणुकीचे काम आता कोणाकडून करून घ्यायचे या कोंडीत निवडणूक शाखेचे अधिकारी सापडले आहेत.