Mon, May 27, 2019 07:24होमपेज › Nashik › ट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालकाचा मृत्यू

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 11:27PMसिन्‍नर : प्रतिनिधी

तालुक्यातील पाटपिंप्री शिवारात  ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत पडून चालकाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.6) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्‍वर निवृत्ती उगले (35, रा. पाटपिंप्री) असे मृत चालकाचे नाव आहे.

ज्ञानेश्‍वर उगले हे स्वत:च्या मालकीच्या ट्रॅक्टरने भाऊसाहेब दत्तू वाळुंज यांच्या शेतात बंधार्‍यातील उपसा काळी केलेली माती पसरविण्याचे काम करत होते. शेतात कठडे नसलेली एक विहीर असून तिचा अंदाज न आल्याने सुरुवातीला ट्रॉली विहीरीत कोसळली. त्यापाठोपाठ उगले ट्रॅक्टरसह विहिरीत पडले. जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या वस्तीवरील एका दहा ते बारा वर्षाच्या मुलाने ट्रॅक्टर विहिरीत पडताना पाहिला. त्याने आरडाओरड करून वस्तीवरील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली.

मात्र, 7 परस खोल असलेल्या विहिरीत साधारणपणे दीड परस पाणी असल्याने कोणालाही बचावकार्य करता आले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यास माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टर व ट्रॉली विहिरीबाहेर काढण्यासाठी हायड्रा क्रेन बोलविण्यात आली. क्रेन घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच वेळ गेला. क्रेन चालकाने ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरत होते. ट्रॅक्टर बाहेर काढताना इंजिनचे तुकडे झाले. अडीच ते तीन तासानंतर ट्रॅक्टर व ट्रॉलीसह बाहेर काढण्यात आला. नगरपालिका दवाखान्यात शवविच्छेदन केल्यानतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्या मार्गदर्शनासाठी पुढील तपास सुरू आहे. सायंकाळी शोकाकूल वातावरणात उगले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण व दोन मुले असा परिवार आहे.