चांदवड : वार्ताहर
चांदवड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा जणांना चावा घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्याचा नगर परिषद प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रविवारी (दि.3) सकाळपासून या कुत्र्याने धुमाकूळ घातला. पार्वताबाई पाटील (90) या महिलेच्या तोंडाला चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर अरबाज शहा (18), फैजल वकील (16), अजय चव्हाण (16), आदेश डुंगरवाल (25), संजय गायकवाड (दीड वर्ष), धीरज आहिरे (5), रमाबाई अहिरे (53), आकांक्षा जाधव (7), कुलदीप शिंदे (14), नवनाथ जाधव (12), श्रावणी वाघ (दीड वर्ष), बबनराव वाघ (61), पारस पवार (9), दीपक कापसे (7) यांना कुत्र्याने चावा घेत जखमी केले. या जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
या कुत्र्याला पकडण्यासाठी नागरिकांनी व नगर परिषद कर्मचार्यांनी प्रयत्न केले. मात्र, कुत्रा हाती लागला नाही. कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिक धास्तावल्याने घराबाहेर पडण्यास धजावत नाही.
नाशिक, ओझर, मालेगाव येथे पकडलेली कुत्री मुंबई-आग्रा महामार्गाने आणून रात्रीच्या वेळी चांदवड शहराच्या परिसरात सोडून दिली जात आहे. यामुळे चांदवड शहरात कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.