Tue, Jun 18, 2019 23:02होमपेज › Nashik › गावठाणसाठी चार एफएसआय देण्याची मागणी

गावठाणसाठी चार एफएसआय देण्याची मागणी

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 11:13PMनाशिक : प्रतिनिधी

क्‍लस्टर डेव्हलपमेंटवरील स्थागिती उठवून विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुचविल्याप्रमाणे जुन्या गावठाणाला चार इतका एफएसआय लागू करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

यासंदर्भात शेलार यांनी खासदार रामदास तडस, आमदार शिरीष चौधरी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेत गावठाण विकासाविषयी चर्चा केली. शहराच्या हद्दीत एकूण 26 गावठाणे आहेत. गावठाणात रहिवास करणारे मूळ स्थानिक नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांना शहराचा विकास करताना विशेष सवलती देण्याची गरज आहे. शहराचा प्रारूप आराखडा करताना नगररचनाचे सहसंचालक प्रकाश भुक्‍ते यांनी गावठाणासाठी अडीच इतके चटई क्षेत्र प्रस्तावित केले होते. परंतु, नगरविकास मंत्रालयाने कोणतीही पूर्व चौकशी न करता एफएसआय दीडपर्यंत कमी केल्याने गावठाणातील मिळकतधारकांवर अन्याय होणार असल्याची बाब शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. गावठाणात 9 मी. पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बहुतांश मिळकतींचा विकासात अस्तित्वापेक्षा कमी एफएसआय अनुज्ञेय होणार असल्याने नव्याने पुनर्विकास मिळकतधारक तयार होणार नाही. परिणामी शहरातील बकालपणा वाढत जाईल. स्मार्ट सिटी योजनेंंतर्गत गावठाणांचा विकास करायचा असेल तर त्याला विकास आराखड्यातील क्‍लस्टर डेव्हलपमेंटशिवाय पर्याय नाही.

मात्र, नगरविकास खात्याने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत गावठाण परिसराचा विकासच होऊ शकणार नाही. क्‍लस्टर डेव्हलपमेंटचे प्रयोजन सरसकट जुन्या गावठाणासाठी लागू करावे, 6 मी. रुंदीच्या रस्त्यावर हे धोरण लागू करावे, चटई क्षेत्र 4.0 इतके असावे म्हणजे जुन्या व पडक्या इमारतींमध्ये भाडेकरूंना हक्‍काचा निवारा देता येईल. जागा मालकास त्याच्या ताब्यातील चटई क्षेत्रापेक्षा 20 टक्के अधिक क्षेत्र मिळावे. तसेच बांधकाम पूर्ण होईपर्यंत नवीन भाड्याची जागा घेण्यासाठी भाडे रक्‍कम मिळावी, 27 गावठाणांसाठी स्वतंत्र योजना करण्याचे अधिकार आयुक्‍तांना द्यावे, जुने गावठाणात पूररेषा नसावी. सामासिक अंतरात सूट देण्यात यावी, अशा विविध मागण्या व सूचना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी अशोक व्यवहारे, चेतन व्यवहारे, नंदन भास्करे आदी उपस्थित होते.  .