होमपेज › Nashik › शेतकर्‍यांशी चर्चेनंतरच जमीन मोजणीचा निर्णय

शेतकर्‍यांशी चर्चेनंतरच जमीन मोजणीचा निर्णय

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:39AMनाशिक : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.14) शासकीय विश्रामगृह येथे शिवडे ग्रामस्थांची भेट घेत समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करू देण्याचे आवाहन केले. मात्र, शिवडे गावातील जमीन भूसंपादन करताना विशेष बाब म्हणून ग्राह्य धरले तरच जमिनी देण्यासाठी विचार केला जाईल, असे सांगत ग्रामस्थांनी चर्चा करून मोजणी करू द्यायची की नाही याचा निर्णय घेऊ, असे शिंदे यांना सांगितले. तूर्तास तरी ग्रामस्थांनी ‘समृद्धी’ला विरोधाचे निशाण फडकवत ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील शिवडे, पाथरे खुर्द येथील शेतकर्‍यांचा विरोध आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांची भेट घेत त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाचा असून, त्यामुळे भविष्यात भरभराट होईल. मात्र, त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनीवर वरवंटा फिरवला जाणार नाही. सकारात्मक चर्चा करून बाधितांना योग्य मोबदला दिला जाईल. आम्हाला कोणालाही बेघर करायचे नाही. शेतकर्‍यांचा विरोध असेल तर एक इंचही जमीन घेणार नाही, या शब्दांमध्ये शिंदे यांनी शेतकर्‍यांना आश्‍वस्त केले.

यावेळी ग्रामस्थांतर्फे सोमनाथ वाघ, विष्णू हारक, अ‍ॅड. सुभाष हारक यांनी भूमिका मांडली. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, शिवडे येथील जमिनी बागायती असून, गावाची द्राक्ष पंढरी म्हणून ओळख आहे. महामार्गामुळे येथील 72 विहिरी बाधित होतील. शिवाय या बागायती जमिनी असून, त्याकडे विशेष बाब म्हणून बघावे, अशी मागणी केली. यावेळी शिंदे म्हणाले, जो पर्यंत जमिनीची मोजणी होत नाही तोपर्यंत किती जमीन बाधित होईल, ही वस्तुस्थिती समोर येणार नाही. तुमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल, या शब्दांमध्ये ग्रामस्थांना आश्‍वस्त करत जमीन मोजणी करू द्यावी, असे आवाहन केले. यावेळी गावात बैठक घेऊन जमीन मोजणी करू द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेऊ, असे सांगत ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन शिंदे यांना दिले.

त्यानंतर शिंदे यांनी पाथरे खुर्द व इगतपुरी गावातील शेतकर्‍यांची भेट घेतली. जमिनीचा चांगला मोबदला दिला जाईल, असे आश्‍वासन दिले. मी एकदा दिलेला शब्द फिरवत नाही, असे सांगत हायपॉवर कमिटीच्या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., खा. हेमंत गोडसे, आ. राजाभाऊ वाजे आदींसह अधिकारी उपस्थित होते.