Tue, Apr 23, 2019 23:53होमपेज › Nashik › पोलिसांची धाड पडताच भांग विक्रेत्याचा मृत्यू

पोलिसांची धाड पडताच भांग विक्रेत्याचा मृत्यू

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 29 2018 10:17PMधुळे : प्रतिनिधी

भांग विक्रीच्या अवैध धंद्याची तपासणी करण्यासाठी पोलीस आल्यानंतर गोटू उर्फ महेश राणा यांचा अचानक मृत्यू झाला. पण पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी करीत रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

रविवारीदेखील पोलीस अधीक्षक कार्यालयात खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर संबंधितांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. दरम्यान भोवळ येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धुळे शहरातील गल्ली नंबर 5 मधील एका घरात भांग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच पोलीस रेकॉर्डवरील आरोपी तपासण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून आले आहे. त्यानुसार पथक राणा यांच्या घरी पोहोचले. पण यावेळी अचानक राणा यांची प्रकृती खराब झाली. यानंतर दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला. यासंंदर्भात मृत महेश राणा यांच्या मुलाने पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्याच्या माहितीनुसार, आझादनगर पोलीस ठाण्याचे महेश मोरे व संजय भोई हे घरी आले. वडिलांंकडे त्यांनी हप्ता मागितला.

अवैध धंदे बंद आहेत मग पैसे कसले, अशी विचारणा केल्यावर त्यांनी मारहाण केली. तसेच  जबरीने खिशातील पैसे काढून घेतले. या मारहाणीमुळे वडील खाली पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नीलेशने केला आहे. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यावर मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवून राणा कुटुंबीय व नागरिकांनी रात्री आझादनगर पोलीस ठाणे गाठले. यानंतर हळूहळू गर्दी जमू लागली. शिवाय संतप्त जमाव तीन मजली पोलीस ठाण्यात आला. शिवाय त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे उपअधीक्षक सचिन हिरे व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी काही मोजक्याच नातलगांना आत दलनामध्ये बोलविले. खुनाचा गुन्हा दाखल करा, पोलिसांनी केलेला हा खून आहे, असे राणा परिवारातील लोक ओरडून सांगत होते.

सुमारे 25 मिनिटांनी  कुटुंबीय दालनाबाहेर आले. पोलीस ठाण्याच्या बाहेर हंबरडा फोडून खुनाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा येथून हटणार नाही असे बोलून अनेक महिला व पुरुषांनी ठिय्या दिला. तर रविवारीदेखील मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका राणा परिवाराने घेतली. त्यामुळे पेच वाढला. या परिवाराने पोलीस प्रशासनाला पत्र देऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी सांगितले की, मृत महेश राणा भांग विक्री करत असे. त्यांच्यावर 2014 ते 17 पर्यंत तब्बल नऊ गुन्हे दाखल आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कर्मचारी मोरे व भोई त्यांच्याकडे कायदेशीर प्रक्रियेसाठी गेले होते.