Wed, Jul 17, 2019 10:47होमपेज › Nashik › उकळत्या पाकात पडून बालिकेचा मृत्यू

उकळत्या पाकात पडून बालिकेचा मृत्यू

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:13PMपंचवटी : वार्ताहर 

उकळत्या पाकात पडून गंभीर भाजल्याने अडीच ते तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पंचवटी परिसरात रविवारी (दि. 29) घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 85 टक्के भाजल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

हिरावाडीतील अयोध्यानगरी 2 येथील शिवकृपानगर येथेे केटरिंगचा व्यवसाय करणारे पप्पू शिरोडे हे रविवारी (दि. 29) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गुलाबजाम बनविण्यासाठी साखरेचा पाक तयार करीत होते. यावेळी त्यांची तीन वर्षाची स्वरा ही मुलगी बाजूला खेळत असताना गरम साखरेच्या पाकात पडल्याने ती मोठ्या प्रमाणात भाजली. शिरोडे यांनी तातडीने मुलीला जुना आडगाव नाका येथील सद‍्गुरू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथील हॉस्पिटल प्रशासनाने सांगितल्यानुसार शिरोडे यांनी उपचारासाठी 50 हजार रुपये डिपॉझिट भरले. तसेच काही औषधे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्याने तीदेखील त्यांनी उपलब्ध करून दिली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल केलेल्या स्वराला तपासण्यासाठी मुख्य डॉक्टर दुपारी साडेतीन ते चार वाजता आले. मुलीची तब्येत फारच खालावली असल्याचे सांगून काही वेळातच त्यांनी तिला मृत घोषित केले.  दरम्यान, सकाळपासून दाखल करूनदेखील वेळीच उपचार न केल्याने स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत सायंकाळच्या सुमारास रुग्णालयामध्ये तोडफोड केली. यामध्ये काही मॉनिटर आणि काचांचेदेखील नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती कळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संतप्त नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीला दाखल करताना 85 टक्के भाजल्याचे सांगत तिचा जीव वाचू शकेल, याबाबत येथील डॉक्टरांनी साशंकता व्यक्‍त करीत आपले म्हणणे स्पष्ट केल्याची माहिती पुढे येत आहे.