Mon, Jan 21, 2019 05:10होमपेज › Nashik › खेरवाडीच्या बेपत्ता युवकांचे मृतदेह विहिरीत आढळले

खेरवाडीच्या बेपत्ता युवकांचे मृतदेह विहिरीत आढळले

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 29 2018 10:26PMसायखेडा : वार्ताहर

निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील बेपत्ता दोन युवकांचे मृतदेह चितेगाव शिवारातील विहिरीत रविवारी (दि.29) दुपारच्या सुमारास आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, रवींद्र सदाशिव निपुंगळे (24) व प्रवीण तानाजी आवारे (22) हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. यातील रवींद्र हा विवाहित, तर प्रवीण अविवाहित होता. गुरुवारी (दि.26) संध्याकाळी दुचाकीने (एमएच-15-डब्ल्यू-7241) घरी कोणालाही काहीही न सांगता ते घरातून बेपत्ता होते. घरच्यांनी मित्र परिवार, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. त्यांच्याकडे असलेल्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ते मिळून न आल्याने सायखेडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. रविवारी दुपारी दोघांचेही मृतदेह चितेगाव शिवारात देशमुख यांच्या विहिरीत आढळून आल्याने दोन्ही कुटुंबांवर मोठी शोककळा पसरली. सायखेडा पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने हे मृतदेह बाहेर काढले.

याठिकाणी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पोलीस उपनिरीक्षक जे. डी. सोनवणे, पोलीस कर्मचारी निंबाळकर, बांगर, मुंढे, पगारे, वाघ, पोलीसपाटील सुभाष माळी, आदींनी मृतदेह विहिरीमधून बाहेर काढण्यास मदतकार्य केले.