Tue, Apr 23, 2019 02:13होमपेज › Nashik › नाट्य परिषद सभास्थळावर मनपाचा आक्षेप

नाट्य परिषद सभास्थळावर मनपाचा आक्षेप

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 08 2018 11:49PMनाशिक : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नियोजित स्थळावर महापालिकेने आक्षेप घेतला असून, महाकवी कालिदास कलामंदिराचे लोकार्पण झाले नसताना त्यात सभा कशी घेत आहात, अशी विचारणा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नाट्य परिषदेला केली आहे. त्यामुळे नाट्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी तातडीने कार्यकारिणीची बैठक बोलवत सभेचे ठिकाण बदलले आहे. 

नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची सन 2017-18 ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 11) महाकवी कालिदास कलामंदिरातील नाट्य परिषदेच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्व सभासदांना सभेची सूचनाही रवाना करण्यात आली होती. या सभेत नव्या घटनेनुसार कार्यकारिणीवर आणखी चार सदस्यांच्या नियुक्‍तीसंदर्भात चर्चा केली जाणार होती. त्यामुळे शहरातील कलावंतांचा एक गट पुढे सरसावला होता व आपल्या गोटातील कलावंतांची नाट्य परिषदेवर नियुक्‍ती व्हावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.

मात्र, मंगळवारी (दि. 8) अचानक नाट्य परिषदेने ही सभाच रद्द केल्याची चर्चा कलावंतांमध्ये सुरू झाली. नव्या सदस्यांच्या नियुक्‍तीवरून कलावंतांतील वातावरण तापल्याने नाट्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी ही सभाच पुढे ढकलल्याची चर्चा शहराच्या नाट्य वर्तुळात सुरू होती. मात्र, नाट्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी (दि. 9) कार्यकारिणीची बैठक बोलावून त्यात या विषयावर चर्चा केली. त्यात ठरल्यानुसार, वार्षिक सभा नियोजित दिवशीच होणार आहे. फक्‍त सभेचे ठिकाण व वेळ बदलण्यात आली आहे. आता ही सभा शनिवारी (दि. 11) साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे सायंकाळी 5 वाजता होणार असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी कळविले आहे. 

दरम्यान, कलावंतांतील राजकारणामुळे नव्हे, तर महापालिकेने सभास्थळावर आक्षेप घेतल्याने सभेचे ठिकाण बदलण्यात आल्याचा दावा प्रा. कदम व ढगे यांनी केला असून, या सभेत सभासदांना फक्‍त नव्या घटनेची माहिती दिली जाणार आहे. नव्या सदस्यांची तातडीने नियुक्‍ती केली जाणार नसून, कलावंतांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत तथ्य नसल्याचे सुनील ढगे यांनी सांगितले.