Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Nashik › आर्थिक शिस्त लावण्यासाठी आयुक्‍त मुंढे यांचे पाऊल

आर्थिक शिस्त लावण्यासाठी आयुक्‍त मुंढे यांचे पाऊल

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 12:41AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी नगरसेवक निधीतील कामांबरोबरच प्रस्तावित पुष्पोत्सवही रद्द करत आपल्या कामाचा आणखी एक दणका महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांना दिला आहे. कामाची आवश्यकता आणि निधीची उपलब्धता पाहूनच कामे होतील, असे पुन्हा एकदा स्पष्ट करत मनपाला आर्थिक शिस्त लावण्यासाठी आयुक्‍तांनी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.

महापालिका अधिनियम आणि लेखा विभागाच्या दृष्टीने कोणतीही तरतूद वा लेखाशीर्ष नसलेल्या नगरसेवक निधीतील कामांची गरज ओळखूनच कामे मंजूर करण्याचे आदेश आयुक्‍त मुंढे यांनी दिले आहेत. यामुळे मनपातील खातेप्रमुख आणि लेखा विभागाकडूनच अशा कामांचे प्रस्ताव आता भिंग लावूनच आयुक्‍तांकडे सादर केली जाणार आहेत. यापूर्वी राजकीय दबावातून नगरसेवक निधी मंजूर करून त्यातून प्रभागातील कामे पूर्ण केली जात होती.

परंतु, आयुक्‍त मुंढे यांच्या भूमिकेमुळे येथून पुढचा नगरसेवक निधीही अडचणीत सापडणार आहे. या आर्थिक वर्षात तत्कालीन आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी स्थायी समिती व महासभेने मंजूर केलेल्या सुमारे 95 कोटी नगरसेवक निधीला मान्यता देत विविध प्रकारची कामे मंजूर केली. यातील बहुतांश निधी खर्ची पडला असून, मार्चअखेरपर्यंत काही नगरसेवकांचा निधी शिल्लक राहिल्याने त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांना आता नवीन आयुक्‍तांनी ब्रेक लावला आहे. यामुळे या कामांविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे असे असले तरी एखाद्या कामाची गरज असेल आणि निधीची उपलब्धता असल्यास अशी कामे करण्याचा मार्गही मोकळा असल्याचे आयुक्‍तांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.