Mon, Aug 19, 2019 11:06होमपेज › Nashik › देशापुढे अंतर्गत सुरक्षेचे आव्हान : मेजर कुलकर्णी

देशापुढे अंतर्गत सुरक्षेचे आव्हान : मेजर कुलकर्णी

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:28PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

दहशतवादी संघटनांच्या आडून देशात पाकिस्तान करत असलेल्या कुरापती, नक्षलवाद व माओवाद यांसारख्या घटनांमुळे देशातील अंतर्गत सुरक्षेलाच आव्हान दिले जात आहे. त्यामुळे देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत निवृत्त मेजर संजय कुलकर्णी यांनी व्यक्‍त केले.

गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासमध्ये रविवारी (दि.24) प्रमिलाबाई रामकृष्ण मिरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ‘भारत : उदयोन्मुख आशियाई लष्करी महासत्ता’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. मधुकर गंधगोळे, भालचंद्रशास्त्री शौचे, अ‍ॅड. विश्‍वास पारख, संस्थेचे विश्‍वस्त प्रा. रा. शां. गोर्‍हे आदी उपस्थित होते.

यावेळी मेजर कुलकर्णी म्हणाले, देशातील 26 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद फोफावला असून, त्यातील सात जिल्हे हे अतिसंवेदनशील आहेत. एकूण 40 हजार स्क्वेअर किमी क्षेत्रात नक्षलवादाचा प्रभाव आहे. या भागांमध्ये मिलिटरी, विशेष पोलीस दल कार्यरत असून, ते नक्षलवाद्यांना समर्थपणे तोंड देत आहेत. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या आडून जम्मू आणि काश्मीरमध्ये कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना तोंड देणे गरजेचे आहे. त्यासाठी देशात आधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधनांचा उपयोग करून त्यावर मात करणे शक्य असल्याचेही मेजर कुलकर्णी यावेळी म्हणाले.

याप्रसंगी डॉ. मधुकर गंधगोळे, भालचंद्रशास्त्री  शौचे आणि अ‍ॅड. विश्‍वास पारख यांना सामाजिक योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते कृतज्ञता गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा. गोर्‍हे यांच्या ‘प्रगत मार्गदर्शन’ आणि ‘अद्ययावत हिंदू वारसा हक्क कायदा’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय मिरजकर यांनी प्रास्ताविक केले.