होमपेज › Nashik › माणकेश्‍वर वाचनालयाची शतक महोत्सवाकडे वाटचाल

माणकेश्‍वर वाचनालयाची शतक महोत्सवाकडे वाटचाल

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 08 2018 11:26PM-रामनाथ शिंदे

स्वातंत्र्यपूर्व काळापासून  दिवसागणिक विज्ञानानेे ज्ञानार्जनाची विविध साधने निर्माण केली. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, संगणक, भ्रमणध्वनी या साधनांद्वारे माहिती संदेशांचे आदानप्रदान होत गेले आहे. सध्या सोशल मीडियाचा सर्वच वयोगटात  वाढता वापर वाढलेला आहे. साहित्य पुस्तके, ग्रंथांपासून आपण दूर जातो की काय, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, 99 वर्षांपासून वाचनसंस्कृतीचे जतन करीत वाचक वर्गही टिकवून ठेवत निफाडचे माणकेश्‍वर वाचनालय अग्रस्थानी राहिलेे आहे.  सोमवारपासून (दि. 9)  या वाचनालयाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. निफाडच्या शिरपेचात आपला मानाचा तुरा डौलाने फडकविणार्‍या या वाचनालयाची शंभरीकडे होत असलेली वाटचाल आणि त्या वाटचालीतील घटनाक्रम त्या निमित्त...

ब्रिटिश राजवटीत शिक्षणामुळे वाचनाचे महत्त्व वाढले आणि वाचनासाठी वर्तमानपत्र, कथा, कादंबर्‍या हे साहित्य वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी वाचनालयांची संकल्पना रुढ झाली. वाचन,  लोकशिक्षणाचे एक महत्त्वाचे माध्यम होते. पहिले महायुद्ध संपल्यानंतर देशातील राजकीय, सामाजिक घडामोडींची माहिती सामान्य जनतेपावेतो पोहचविण्यासाठी केवळ वर्तमानपत्र हाच एकमेव मार्ग होता. फारसा विकास नसलेल्या त्या काळात निफाडसारख्या गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने वाचन चळवळीचे रोपटे लावण्याचा ठराव संमत केला आणि निफाडच्या भूमीत दिवंगत चिंतामणराव गाडगीळ, विष्णूपंत सोनवणी, भाऊसाहेब उगावकर या त्रिकुटाने श्री माणकेश्‍वर महादेवाच्या साक्षीने माणकेश्‍वर  वाचनालयाची स्थापना 9 जुलै 1919 रोजी केली.

वाचनालयाच्या कारभाराची वाचनसंस्कृतीची जोपासना करण्याबरोबरच देश, राज्यातील घडामोडींची माहिती तळागाळात पोहचविण्यापर्यंत होऊ लागला. निफाडच्या भूमीला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कन्या मुक्ताबाई फणसे यांचा फणसेवाडा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंची जन्मभूमी आणि सुप्रसिद्ध लेखक, संपादक माधवराव गडकरी अशा इतिहासात नोंद असलेल्या दिग्गजांची पार्श्‍वभूमी आहे. हाच धागा पकडत श्री माणकेश्‍वर वाचनालयाने 99 वर्षांपूर्वी वाचनसंस्कृती जतन करीत विस्तारावली आहे. शासनमान्य तालुका ‘अ’ वर्ग दर्जा असलेल्या या वाचनालयात दुर्मीळ आणि विविध संदर्भग्रंथांचा खजिनाच आहे.

वाचनालयात कथा, कादंबरी, चरित्रे, आत्मचरित्रे, विनोदी नाटके, संकिर्ण कविता, संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा अशा नानाविध विषयांवरील तीस हजार 254  इतकी ग्रंथसंपदा, 18 वर्तमानपत्रे, 14 साप्ताहिके, 71 मासिके, 65 दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथसंपदेचा माणकेश्‍वर वाचनालयाचा 698 सभासद लाभ घेत आहेत. ग्रामीण भागातील उत्कृष्ट ग्रंथालय राष्ट्रीय पुरस्कार  म्हणून कोलकात्याच्या राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानकडून माणकेश्‍वर वाचनालयाचा गौरव 2005 मध्ये करण्यात आला आहे. तर वाचनालयाचे ग्रंथपाल बाळासाहेब खालकर यांनाही राज्य शासनाचा ग्रंथालय शास्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला आहे. माणकेश्‍वर वाचनालयाच्या वतीने 1994 व 2005 मध्ये नाशिक जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशनही घेतले होते.

समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला. त्याच जागेवर जन्मस्थळी न्या. रानडेंचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा संकल्प वाचनालयाने केला आणि जन्मस्थळाची जागा 2009 मध्ये खरेदी केली. सव्वा कोटी रुपये अंदाजित खर्चाची स्मारकाची इमारत उभी करण्यासाठी शासन दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था विश्‍वस्त मंडळे यांचे योगदानातून 15 ऑगस्ट 2010 ला भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामकाजाचा श्रीगणेशा  झाला. आतापर्यंत पाऊण कोटीवर खर्च करून स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे.

कोलकात्याच्या राजाराम मोहनरॉय फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे 23 लाखांचे अनुदान मिळाले असून, अद्यापही दानशुरांच्या आधाराची गरज वाचनालयाला असल्याचे अध्यक्ष मधुकर शेलार व चिटणीस दत्ता उगावकर यांनी सांगितले. वाचनालयामार्फत विविध योजनांद्वारे स्मारकाच्या पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध केला जातो. वाचनालयाने 
स्वतःची वेबसाईटwww.justiceranade.org तयार केलेली आहे. त्याद्वारे मिळालेल्या माहितीतून न्यायमूर्ती रानडेंचे पणतू आर.  एम. विद्वांस यांनी पाच लाख, तर न्या. रानडेंच्या पणती श्रीमती वसुधाताई आपटे यांनी दोन लाख साठ हजार रुपयांची देणगी दिली आहे. याच देणगीतून न्यायमूर्ती रानडे यांचा अर्धाकृती पुतळा तयार करण्यात आला असून, लवकरच या राष्ट्रीय स्मारक लोकार्पण व इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून वाचनालयाच्या वतीने निफाडचे भूमिपुत्र गीतकार दिवंगत राम उगावकर स्मृती पुरस्काराने लोकप्रिय कवी, गीतकारास सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत गीतकार उत्तम कोळगावकर, प्रकाश होळकर यांचा सन्मान झाला आहे.

सांस्कृतिक व वाचन क्षेत्रात 99 वर्षांची वाटचाल पूर्ण करीत हे वाचनालय आता 100 व्या वर्षात पोहोचतंय, त्या निमित्ताने 9 जुलैपासून वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करून वाचकांना मेजवानी देण्याचे नियोजन केले आहे. ग्रामीण भागात संपूर्ण जिल्ह्यात शंभरी पार करणारे हे तिसरे वाचनालय आहे. सामाजिक, राजकीय सांस्कृतिक अनेक स्थित्यंतरे पाहिलेल्या वाचनालयाद्वारे वाचन चळवळीची मशाल अनेकांच्या अज्ञानाच्या अंधःकाराला ज्ञानाचा प्रकाश देत शंभरीत पदार्पण करत आहे. त्यांच्या दीपस्तंभीय कार्यासह शतकमहोत्सवाला शुभेच्छा.