होमपेज › Nashik › उड्डाणपूल निर्मितीपूर्वीच बसची भाडेवाढ!

उड्डाणपूल निर्मितीपूर्वीच बसची भाडेवाढ!

Published On: Jan 19 2018 1:53AM | Last Updated: Jan 19 2018 12:25AMमालेगाव : सुदर्शन पगार

शहरात उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने बस भाडेवाढ आकारणी आरंभल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लांब पल्ल्यांच्या बसेस नेहमीप्रमाणे मार्गक्रमण करत असताना वाढीव टप्प्यांची तिकिटदर आकारणी करत असल्याची तक्रारी आहेत. आगार व्यवस्थापनाच्या या आगाऊ निर्णयाला प्रवासी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन बसस्थानकाजवळील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल मंजूर झाला आहे. मुख्य अग्निशमन कार्यालय ते सखावत हॉटेलदरम्यान 504 मीटर लांबीचा व 12 मीटर रुंदीचा हा पूल साकारला जाणार आहे. अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील या कामासाठी दरेगावकडे जाणारी व येणारी वाहतूक वळवावी लागणार आहे. त्याशिवाय बांधकाम करणे शक्य होणार नाही. याप्रश्‍नी आगार व्यवस्थापनासह मालट्रक मालक संघटनांची बैठकदेखील झाली. त्यात धुळे मार्गावरील बसफेर्‍या वळविण्याचा निश्‍चित झाले. 

धुळेकडून येणार्‍या बसेस मनमाड चौफुलीपासून मोसमपूल आणि नंतर जुन्या किंवा नव्या बसस्थानकात येतील. धुळेकडे जातांना ही याचप्रमाणे आत-बाहेर जातील. त्यामुळे साधारण नऊ किमीचा फेरा वाढणार आहे. त्यापोटी प्रवासी भाडेवाढ करण्याशिवाय गत्यंतर नसल्याची बाब आगार व्यवस्थापनाने स्पष्ट केली होती. नियमानुसार वाढणार्‍या टप्प्यानुसार भाडेवाढीचा आयुक्त, आमदार, महापौर, शहर वाहतूक नियंत्रण कक्षाच्या बैठकीत विचारविनिमय झाला आहे. परंतू, प्रत्यक्षात पूलाचे काम सुरू होऊन बसफेर्‍यांचा फेरा वाढण्यापूर्वीच या मार्गावरील काही आगारांनी बसभाडे वाढ आरंभली आहे. त्यामुळे आगार व्यवस्थापनाविषयी प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.