Mon, May 20, 2019 11:20होमपेज › Nashik › देशभर आंदोलन केले तर शेतकरी अन् शेती वाचेल!

देशभर आंदोलन केले तर शेतकरी अन् शेती वाचेल!

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:20PMपिंपळगाव बसवंत/काकासाहेब नगर : वार्ताहर

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नाही. परिणामी, खर्चाचा आकडा वाढून शेतकर्‍यांचे कर्ज वाढते. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती सध्या अशीच झाल्यामुळे गेल्या चार वर्षांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे विदर्भापेक्षाही नाशिक जिह्यात वाढले आहे. यामुळे शेती व शेतकरी वाचवायचा असेल तर शेतकरी आंदोलन आता संपूर्ण देशात उभारावे लागेल, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले.

निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथे आयोजित हल्लाबोल मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे, रविकांत तुपकर, हंसराज वडघुले, संदीप जगताप, गोविंद पगार, सुधाकर मोगल, घनश्याम चौधरी, साहेबराव मोरे, माजी आमदार दिलीप बनकर, यतीन कदम, निवृत्ती गारे, रणजित बागूल, भाऊसाहेब तासकर, दीपक पगार, सोमनाथ बोराडे उपस्थित होते.

हल्लाबोल मेळाव्याची भूमिका मांडताना शेट्टी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात 1980 मध्ये जी शेतकरी चळवळ अत्यंत दमदार होती, त्याचाच आदर्श आम्ही घेऊन आमच्या भागात शेतकरी प्रश्‍नासाठी लढलो. मात्र, मधल्या काळात चळवळ थंड झाल्यानेच इथला शेतकरी अडचणीत आला आहे. त्याची एकता कमी होत आहे.

त्यामुळे चळवळीचा वणवा पुन्हा पेटवून निफाड कारखान्याचा प्रश्‍न निकाली काढायचा  आहे. ज्यांनी कोणी निफाड कारखाना बंद पाडला त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला आपल्याला भाग पाडावे लागणार आहे. सरकार शेतमाल पिकवणारा शेतकरी आणि खरेदी करणारा ग्राहक यामध्ये भेदभाव करू पाहत आहे. गेल्या काळात सरकारने शेतीविषयक चुकीची धोरणे राबविली. परदेशातून माल आयात केला. परिणामी, येथील शेतकर्‍याच्या मालास भाव मिळाला नाही.

मागच्या चार वर्षांत परदेशातून आयात केलेल्या मालावर आयातीचा खर्च एक लाख चाळीस हजार कोटींवर गेला आहे. तर हा खर्च पूर्वी अठ्ठावीस हजार कोटींवर होता. म्हणजेच इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारला माल आयात करून खर्च करण्याची काहीच गरज नव्हती. उलट यात संपूर्ण शेतकर्‍यांचे कर्ज माफ करता आले असते. शेतकरी ज्या ज्या वस्तू शेतीसाठी खरेदी करतो त्या सगळ्यांवर जीएसटी आहे. मात्र, आमच्या शेतीमाल विक्रीनंतर कुठला जीएसटी शेतकर्‍याला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, म्हणून स्वामिनाथन् आयोग त्वरित लागू करावा.

दरम्यान, येत्या 26 जानेवारीला रानवड कारखाना चालू होत असून, लवकरच निफाड कारखाना सुरू करण्यासाठी मोठा लढा उभारणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

शेतकरी आत्महत्येवर रविकांत तुपकर म्हणाले की, आज विदर्भापेक्षा नाशिकमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. शेतकर्‍यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही म्हणून राज्यात प्रत्येक गावात 30 ते 35  शेतकरी तरुण अविवाहित आहेत. राज्यात शेतकर्‍यांच्या सोळा-सतरा वर्षाच्या मुलींना बापाकडे लग्नाला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करावी लागते. परंतु, आता शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे, नाही तर शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. कारण या सरकारच्या काळात कांदा, द्राक्ष, टोमॅटो, सोयाबीन, कापूस सगळ्याच पिकाचे भाव कोलमडले आहेत. त्यामुळे 190 संघटना हाताशी घेऊन खासदार राजू शेट्टी देशभर जो शेतकरी लढा उभारत आहे. त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी पिंपळगाव, निफाड  व पालखेड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतकर्‍यांनी यावेळी शेतकरी एकजुटीबरोबर राहण्याची शपथ घेतली.

1980 च्या दशकातील चळवळीचा उल्लेख

1980 च्या दशकात शेतकरी नेते माधवराव मोरे यांनी शेतकरी प्रश्‍नासाठी संपूर्ण नाशिक जिल्हा पिंजून काढून शेतकरी एकजूट तयार केली होती. ज्याचा आदर्श संपूर्ण राज्यातील शेतकरी कार्यकर्त्यांनी घेतला. तो वचक परत निर्माण करणे गरजेचे आहे, हे सांगताना खासदार शेट्टी यांना त्या कालच्या कणखर चळवळीचा उल्लेख केला.