होमपेज › Nashik › मुंढेंच्या अल्टिमेटमने अधिकार्‍यांना फुटला घाम

मुंढेंच्या अल्टिमेटमने अधिकार्‍यांना फुटला घाम

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 11:38PMनाशिक : प्रतिनिधी

कामकाजात सुधारणा करण्यासाठी मनपा अधिकारी, कर्मचार्‍यांना दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपत आल्याने आयुक्त काय पवित्रा घेतात या विचारानेच अधिकार्‍यांना घाम फुटला आहे. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज आयुक्तांना तीन महिने पूर्ण होत आहेत. त्यानंतर सर्व प्रलंबित फाइल आणि कामे पूर्ण करण्यास त्यांनी तीन महिन्यांचा अवधी सर्वांना दिला होता.

फाइल पेंडन्सीसंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वांनाच नियोजनात्मक कार्यक्रम देत सर्व कामांचा निपटारा करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. तेव्हापासून कर्मचारी आणि अधिकारी गेल्या तीन महिन्यांतील दुसरा आणि चौथा शनिवार तसेच सर्व रविवारच्या दिवशीदेखील महापालिकेत हजेरी लावून काम पूर्ण करताना दिसत होते. तसेच इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील कर्मचारी कामावर येत होते. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रात्रीचा दिवस एक करत कर्मचारी अधिकारी काम करत असल्यने फायलींचा निपटारा झालेला असला तरी अद्यापही काही विभागांचे काम पूर्ण होणे बाकी आहे.

दर आठवड्यातील सोमवारी खातेप्रमुखांची आढावा बैठक घेऊन आयुक्त मुंढे कामकाजाची माहिती घेत होते. यामुळे दर आठवड्याच्या बैठकीतून अनेक बाबी समोर आल्या असून, फाइल पेंडन्सी तसेच कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. सोमवारी (दि.7) खातेप्रमुखांच्या बैठकीतही आयुक्तांनी दिलेल्या अल्टिमेटमची आठवण करून देत काम पूर्ण करण्याची सूचना केली. तीन महिन्यांत आयुक्तांनी 11 कर्मचार्‍यांचे निलंबन आणि तीन कर्मचार्‍यांना बडतर्फ केले आहे.