Wed, May 22, 2019 06:20होमपेज › Nashik › कोल्हापूर संघाने पटकावले फुटबॉलमध्ये अजिंक्यपद

कोल्हापूर संघाने पटकावले फुटबॉलमध्ये अजिंक्यपद

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 10 2018 11:50PMनाशिक : प्रतिनिधी

कोल्हापूर संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाच्या जोरावर नागपूर संघाचा पराभव करत राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खुला गट पुरुष फुटबॉल स्पर्धेत रविवारी (दि. 10) कोल्हापूर व नागपूर संघात लढत झाली. पंचवटीमधील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या मिनिटापासूनच विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, सामन्याच्या सातव्याच मिनिटास कोल्हापूरच्या सूरज शिंगाटे याने अप्रतिम हेडरद्वारे गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, या गोलनंतरही नागपूरच्या संघाने आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिआक्रमण केले. यावेळी नागपूर संघास मिळालेल्या पेनल्टी किकचा फायदा उचलत संघातील खेळाडू विकास कनोजिया याने गोल केला.

सामन्याच्या दुसर्‍या सत्रात मात्र कोल्हापूर संघाच्या निखिल कुलकर्णी याने 51 व्या मिनिटाला, तर 53 व्या मिनिटाला प्रथमेश हिरेकण व 61 व्या मिनिटाला सिद्धेश यादव यांनी एकामागोमाग गोल करून नागपूर संघाची दाणादाण उडवून दिली. सामन्यात 71 व्या मिनिटाला कोल्हापूरच्या संकेत साळोखे याने पाचवा गोल करून संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव साउटर वाझ, इस्पेलियर स्कूलचे सचिन जोशी, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अजिंक्य वाघ, नाशिक फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष गुलजार कोकणी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.