होमपेज › Nashik › खेडी विकासासाठी अखेर दहा कोटींचा निधी मिळाला  

खेडी विकासासाठी अखेर दहा कोटींचा निधी मिळाला  

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:00AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

खेडे विकास निधीसंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. या दहा कोटींच्या निधीतून पाणी आणि ड्रेनेज या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, याबाबत लवकरच संबंधित प्रभागातील सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून विविध कामांचे प्रस्ताव मागविले जाणार आहेत. 

अंदाजपत्रकात खेडे विकास निधीसाठी तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी मनपा स्थायी समिती व महासभेने प्रशासनाला तशी सूचना केली होती. परंतु, त्यानंतर मात्र खेडे विकास निधी रस्ते कामांच्या 257 कोटी रुपयांमध्ये वळती करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे मनपा हद्दीतील 22 ग्रामीण भागाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्‍त करत निधीची मागणी केली होती. त्यावर महापौर रंजना भानसी यांनी खेडे विकास निधी ग्रामीण भागातील विकासासाठीच राहील.

अन्यत्र वळती केला जाणार नाही, असे ठामपणे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत निधी खेड्यांच्या विकासासाठीच प्राप्‍त करून घेतला आहे. यासंदर्भात महापौरांसह उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, सभापती शिवाजी गांगुर्डे, गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी अतिरिक्त आयुक्‍त रमेश पवार आणि शहर अभियंता यू. बी. पवार यांच्याकडून आढावा घेतला. त्यात एक आठवड्यात संबंधित खेड्यांमध्ये प्राधान्याने करावयाच्या कामांचा अहवाल तयार करण्याची सूचना महापौरांनी केली. या अहवालानंतर संबंधित प्रभागातील सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडूनही विकासकामांचे प्रस्ताव मागविले जाणार आहेत.