होमपेज › Nashik › नाशिकमध्ये नीचांकी तापमानाची नोंद;थंडीचा जोर कायम

नाशिकमध्ये कडाक्याची थंडी; नीचांकी तापमान

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 27 2017 9:45AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा कमालीचा घसरला असून, आज ८.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हे तापमान राज्यात नीचांकी तापमान म्हणून नोंदविले गेले. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. 

डिसेंबरच्या मध्यावधीनंतर तापमानाचा पारा सातत्याने घसरत आहे. नाशिककरांना खर्‍या अर्थाने कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे. कडाक्याच्या थंडीतही ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सण उत्साहात साजरा केला. 

सोमवारी 9.4  तर मंगळवारी 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठ दिवसांपासून तापमानाचा पारा 13 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकलेला नाही. गेल्या 17 डिसेंबरला 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर दुसर्‍याही दिवशी हेच तापमान कायम होते. 19 डिसेंबरला मात्र तापमान अडीच अंश सेल्सिअसने घसरले आणि यादिवशी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुलाबी थंडीचा अनुभव नाशिककरांनी घेतला. 20 डिसेंबरला मात्र तापमान  साडेतीन अंश सेल्सिअसने वाढले. 21 डिसेंबरला पुन्हा 10 अंश सेल्सिअसच्या आत आले आणि 9.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. 24 डिसेंबरला याच तापमानाची नोंद झाली.  सोमवारीही पारा काही अंशी घसरल्याने 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारीही 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. म्हणजे, सलग तीन दिवस तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आतच नोंदविले गेले. 

तापमानाचा घसरता पारा गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाढती थंडी मात्र भाजीपाल्याच्या वाढीसाठी मारक असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे भाजीपाल्याचेही दर वाढण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवरही परिणाम होणार असल्याने उत्पादक धास्तावले आहेत. तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअच्या खाली घसरल्यास द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचीही भीती आहे.