Sat, Feb 16, 2019 15:22होमपेज › Nashik › शिक्षक दिनी शिक्षकांचेच काळ्या फिती लावून आंदोलन

शिक्षक दिनी शिक्षकांचेच काळ्या फिती लावून आंदोलन

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:44PMसायखेडा : वार्ताहर

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू व्हावी, यासाठी वारंवार आंदोलने, निवेदने, निदर्शने करूनही, सरकार लक्ष देत नसल्याने, शिक्षक दिनाच्या दिवशी निफाड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून शालेय कामकाज केले.

2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांची तत्कालीन सरकारने पेन्शन बंद करून अंशदायी पेन्शन योजना सुरू केली. या योजनेत कर्मचार्‍यांची फसवणूक असून, शासन दरमहा पगारातील दहा टक्के रक्कम कपात करून, तीच रक्कम कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर परत करणार आहे, त्यात सरकारही काही रक्कम अदा करणार असली तरी अनेक वर्षे शासन कर्मचार्‍यांच्या पगारातील रक्कम वापरणार आहे. तो पैसा शेअर्स मार्केटमध्ये गुंतवून, त्यातून मिळणारी रक्कम परतावा म्हणून देणार आहे. यात शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर त्याचा फायदा किती होईल याची शाश्‍वती नसल्याने सरकार फसवणूक करत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या योजनेला विरोध करण्यासाठी राज्यात जुनी पेन्शन हक्क संघटना कार्य करत आहे. या संघटनेने अनेक वेळा निवेदने दिली, मोर्चे, उपोषण, संप पुकारून देखील शासन केवळ आश्‍वासने देत असल्याने शिक्षक दिनाच्या दिवशी राज्यात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज केले. यात निफाड तालुक्यात 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांनी निषेध नोंदवला आहे.