होमपेज › Nashik › शिक्षकांच्या आंदोलनांनी गाजला दिवस

शिक्षकांच्या आंदोलनांनी गाजला दिवस

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 12:43AMनाशिक : प्रतिनिधी

जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (दि.17) धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना कॅशलेस मेडिक्‍लेम योजना लागू करावी. 23 ऑक्टोबर 2017 चा वरिष्ठ वेनतश्रेणी व निवडश्रेणीसाठीचा निर्णय रद्द करावा. ऑनलाइन कामाचे प्रमाण 20 टक्के आणणे. शाळांची वीजदेयके शासनाने परस्पर वीज मंडळास अदा करावी.

2005 नंतरच्या मयत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्यात यावी. 1-2 जुलैच्या घोषित शाळांना अनुदान जाहीर करावे. दर महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्यात यावे, आकृतिबंध त्वरित जाहीर करावा, प्राथमिक विभागासाठी वरिष्ठ वेतनश्रेणी व चटोपाध्याय त्वरित लागू करण्यात यावे यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

आंदोलनात परिषदेचे नाशिक विभाग कार्यवाहक डी. यू. अहिरे, जिल्हाध्यक्ष दत्ता वाघ, शरद निकम, गुलाब भामरे, विलास सोनार, संजय पगार, सुमन हिरे, संजय पवार, उमेश मोेरे यांच्यासह इतर शिक्षक सहभागी झाले होते.

प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे आंदोलन

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक तालुका प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने पंचायत समितीसमोर धरणे धरण्यात आली.

प्रोत्साहन भत्त्यात दरवर्षी वाढ करण्यात यावी, जून 2013 ते डिसेंबर 2015 या कालावधीतील एकस्तर व प्रोत्साहन भत्ता फरक देयके मिळावीत, एलआयसी हप्‍ता कपात पगारातून करण्यात यावी, 39 ब प्रलंबित देयके त्वरित मिळावीत, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजुरीसाठी पाठविण्यात यावीत, आदिवासी क्षेत्रातील सर्व गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावीत, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पाच हप्‍ते फंडात जमा करण्यात यावे आदी मागण्यांसाठी धरणे धरण्यात आली.

यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात सुभाष अहिरे, चंद्रकांत लहांगे, अशोक ठाकरे, सचिन बाविस्कर, रवींद्र भदाणे, राजेंद्र भामरे, रवींद्र लहारे, तुकाराम पोटिंदे, गजानन चव्हाण, सचिन सोर, राहुल सोनवणे, भागवत गायकवाड, गोविंद पाटील, बाळू भोये, राजेंद्र माळी, मोहन रणदिवे, प्रदीप पेखळे, सुभाष साईनकर, रामनाथ सानप, प्रदीप पालवे, राजाराम ठाकरे, प्रवीण सोनवणे आदी शिक्षक सहभागी झाले होते.