Tue, Jul 23, 2019 11:34होमपेज › Nashik › नवीन मालमत्तांवर करयोग्य मूल्य दराची आकारणी सुरू 

नवीन मालमत्तांवर करयोग्य मूल्य दराची आकारणी सुरू 

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:57AMनाशिक : प्रतिनिधी

करयोग्य मूल्यदराविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसताना महापालिका प्रशासनाने मात्र नवीन मिळकतींवर कर आकारणी सुरू केली आहे. महासभेत झालेला निर्णय आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडूनही अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही, असे असताना प्रशासनाने मात्र महासभा आणि पालकमंत्र्यांच्या निर्णयालाही खो देऊन टाकला आहे. 

मोकळे भूखंड, पार्किंग, सामासिक अंतर, तरणतलाव यासह विविध प्रकारच्या जमिनीवर तसेच मालमत्ता सर्वेक्षणात आढळून आलेल्या 58 हजार मिळकतींवर मनपा आयुक्तांनी करयोग्य मूल्य दर (रेटेबल व्हॅल्यू) लागू केला होता. त्याबाबतचा आदेशही त्यांनी काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश कर विभागाला दिले होते. परंतु, या निर्णयास अन्याय निवारण कृती समिती आणि लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोधकेला. आजही हा विरोध कायम आहे. 

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेतही महापौर रंजना भानसी यांनी करयोग्य मूल्य दरवाढीस विरोध करत प्रशासनाचे आदेश रद्द ठरविले होते. महासभेच्या या निर्णयानंतर आयुक्त आणि लोकप्रतिनिधींमध्ये भांडण सुरू झाले होते. करयोग्य मूल्य दर ठरविण्याचा अधिकार कुणाला यावरून सुरू झालेला वाद पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचला. त्या ठिकाणीही ठोस निर्णय न झाल्याने हे भिजत घोंगडे बंद फाइलमध्ये पडून असतानाच प्रशासनाने मात्र बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेल्या आणि सर्वेक्षणात नवीन आढळून आलेल्या मिळकतींवर करयोग्य मूल्य दर निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे प्रशासनाने महासभेच्या निर्णयाला एक प्रकारे केराचीच टोपली दाखविली आहे. वास्तविक अद्याप पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यकडून निर्णय येणे बाकी आहे, असे असताना मनपा आयुक्तांनी महासभेबरोबरच पालकमंत्र्यांनाही एक प्रकारे आव्हानच देऊ केले आहे.