Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Nashik › बंदी झुगारून तांगा शर्यती; दहा जणांवर गुन्हे दाखल

बंदी झुगारून तांगा शर्यती; दहा जणांवर गुन्हे दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी झुगारून नाशिक जिल्ह्यातील चांदगिरी या गावी शनिवारी (दि.31) घोडा आणि बैलजोडीच्या तांगाशर्यती भरविणार्‍या दहा जणांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शर्यतींना विरोध करीत या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणार्‍या ‘आवास’ या प्राणिमित्र संघटनेच्या अध्यक्षावरही टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात प्राणिमित्र गौरव क्षत्रिय हे जखमी झाले आहेत. 

नाशिक-पुणे महामार्गालगतच्या चांदगिरी या गावात शनिवारी घोडाबैल तांगाशर्यती सुरू असल्याबाबत प्राणिमित्रांच्या ‘आवास’ या संघटनेला माहिती समजली. त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष क्षत्रिय यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोठ्या गाजावाजात सुरू असलेल्या या शर्यतींना क्षत्रिय यांनी विरोध दर्शविला. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही तुन्ही तांगा शर्यती भरवल्याच कशा, असा सवाल करीत क्षत्रिय यांनी  तांगाशर्यतींचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांच्या घोळक्याने क्षत्रिय यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत फोडून टाकला. झटापटीत क्षत्रिय यांचा शर्टही फाटला.

यावेळी काहींनी क्षत्रिय यांच्या दिशेने दगडफेकही केली. जीव वाचविण्यासाठी सहकार्‍याच्या मदतीने क्षत्रिय यांनी दुचाकीवरून पळ काढला. मात्र, आयोजकांच्या टोळक्याने सात ते आठ कि.मी.पर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्यांनी थेट नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. यावरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोेधात  मारहाणीची तक्रार दाखल झाली आहे. या घटनेत जखमी झालेले क्षत्रिय यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार करण्यात आले.  दरम्यान, न्यायालयाची बंदी झुगारून तांगाशर्यती घेतल्यामुळे आयोजकांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यांच्यावर कारवाई

प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्यानुसार कारभारी यशवंत वांजुळ, झुंबर महादू बागूल, गणेश वामन कटाळे, बाळू जगन्नाथ कटाळे, कृष्णा खंडेराव बागूल, मुकुंदा पुंडलिक कटाळे, जयराम कचरु वांजुळ, भारत राधु कटाळे, सोमनाथ महादू बागूल, (सर्व राहणार चांदगिरी) खंडू नभाजी बोडके (सावळी, ता. निफाड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निष्पाप प्राण्यांवर अन्याय होऊ नये, हा  उद्देश समोर ठेवून मी आयोजकांना तांगा शर्यती घेऊ नये, अशी विनंती करीत होतो. परंतु त्यांनी माझे ऐकून न घेता थेट हल्ला केला. मी तिथून पळ काढला नसता तर कदाचित जीवाला मुकावे लागले असते. याविरोधात मी नाशिकरोड पोलिसांत तक्रार केली, मात्र त्यांनी केवळ सोपस्कार पार पाडत साधी तक्रार नोंदविली. खरेतर त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल व्हायला हवा.    - गौरव क्षत्रिय, अध्यक्ष, ‘आवास

 

Tags : nashik, nashik news, Tanga race, Criminal cases filed,


  •