Mon, Jun 17, 2019 14:27होमपेज › Nashik › तळेगाव बलात्कार प्रकरणी अल्पवयीनास 2 वर्षे शिक्षा

तळेगाव बलात्कार प्रकरणी अल्पवयीनास 2 वर्षे शिक्षा

Published On: Aug 03 2018 1:36AM | Last Updated: Aug 02 2018 11:13PMनाशिक : प्रतिनिधी

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील तळेगाव येथे दोन वर्षांपूर्वी चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईच्या जलदगती न्यायालयाने अल्पवयीन आरोपीस दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. गुन्हा घडल्यानंतर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेत बाल निरीक्षणगृहात ठेवले होते. तेव्हापासून तो तेथेच आहे. बलात्काराच्या घटनेनंतर तळेगाव येथे दोन गटात दंगल झाली होती. 

8 ऑक्टोबर 2016 रोजी तळेगावात 5 वर्षीय चिमुरडीवर अल्पवयीन आरोपीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती समजताच तळेगावसह जिल्ह्यात हिंसा भडकली होती. तळेगाव येथे निषेध नोंदवत असताना दंगल उसळली. या दंगलीचे लोण नाशिकसह त्र्यंबकेश्‍वरसह इगतपुरी तालुक्यातही पसरले होते. अफवांमुळे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दोन दिवस बंद ठेवली होती. तसेच या दंगलीमुळे पोलिसांच्या वाहनांसह सार्वजनिक व खासगी वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे शासनाकडून हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यात आला. त्यात आरोपी विरोधातील ठोस पुरावे मिळाल्याने जलद न्यायालयाने त्यास दोषी ठरविले आणि 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. गुन्ह्यात ताब्यात घेतल्यापासून अल्पवयीन आरोपी बालनिरीक्षण गृहाच्याच ताब्यात आहे.