Tue, May 21, 2019 00:54होमपेज › Nashik › प्राच्यविद्या टिकविण्यासाठी घ्यावी तंत्रज्ञानाची मदत

प्राच्यविद्या टिकविण्यासाठी घ्यावी तंत्रज्ञानाची मदत

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:17PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

प्राच्यविद्येतील विविध विषयांमधील समृद्ध ज्ञानपरंपरेचा वारसा जतन करण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. संगणक विद्येचा आधार घेऊन भविष्यातील आव्हाने पेलता येतील. प्राच्यविद्या टिकवून ठेवण्यासाठी तरुण संशोधकांनी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असे आवाहन आयआयटी मुंबई मानव्यविद्या आणि समाजशास्त्र शाखेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हार कुलकर्णी यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रिं. टी. ए. कुलकर्णी सभागृहात  बृहन्महाराष्ट्र  प्राच्यविद्या परिषदेच्या तीनदिवसीय 12 व्या अधिवेशनाचे उद्घाटन सोमवारी (दि.25) डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाले, संगणक आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. ज्ञानाच्या विविध शाखांमध्येही संगणकाला टाळून पुढे जाणे शक्य नाही. आधुनिकतेची कास धरून प्राच्यविद्येचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. गणेश थिटे म्हणाले,  संस्कृत भाषेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, ही चितेंची बाब आहे. संस्कृतचे त्रोटक ज्ञान असणार्‍यांना भाषा संवर्धनासाठी काम केले म्हणून पारितोषिके दिली जातात. विशेष म्हणजे, पुरस्कार देणार्‍यांनादेखील संस्कृतचे ज्ञान नसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देवभक्ती, देशभक्ती आणि देहभक्ती या तीनच विषयांवर संस्कृतमधून काव्य करणार्‍यांचा जयजयकार होत असून, ही संस्कृतसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. नुपूर सावजी हिने सूत्रसंचालन केले. संस्कृत विभागप्रमुख डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी आभार मानले.

विविध विषयांवर चर्चा  

परिषदेत  वेद आणि अवेस्ता, व्याकरण आणि भाषाशास्त्र, अभिजात साहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान, इतिहास आणि पुरातत्त्व विभाग, प्राचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान, नाशिक-इतिहास व संस्कृती या विषयांवर चर्चा करण्यासाठी देशभरातील सुमारे 180 प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे.  पुरातत्त्व आणि संग्रहालय विभाग मुंबईचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पुणे विद्यापीठाचे प्रा. मिहीर अर्जुनवाडकर, डेक्कन विद्यापीठाचे डॉ. प्रसाद जोशी, वाईच्या डॉ. अंजली पर्वते, मुंबई विद्यापीठाचे डॉ. साहेबराव निगळ, इतिहासाचे अभ्यासक प्रा. डी. एम.  पठाण आदींनी परिषदेला हजेरी लावली.