Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Nashik › जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 11:19PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 12 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकच्या तहसीलदारपदी शिवकुमार आवळकंठे यांची तर नांदगावच्या तहसीलदारपदी भारती सागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

सरकारने राज्यातील सर्वच विभागांमधील तहसीलदार व उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी (दि.23) रात्री उशिराने काढले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तहसीलदारांचा समावेश आहे. या बदल्यांमध्ये नांदगावचे प्रभारी तहसीलदार आवळकंठे यांची नियुक्ती नाशिकला झाली असून, त्यांनी शुक्रवारी (दि. 24) पदभार स्वीकारला. नाशिक धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले यांची विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वसाधारण शाखेत बदली झाली आहे. त्यांच्या जागी इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांची निवड करण्यात आली. नांदगावच्या नूतन तहसीलदार सागरे यांच्याकडे पूर्वी पारनेर तहसीलची जबाबदारी होती.

विभागीय महसूल कार्यालयातील आस्थापना विभागाच्या तहसीलदार मंजूषा घाडगे यांची नाशिक महसूल प्रबोधिनी तहसीलदारपदी बदली झाली आहे. प्रबोधिनीच्या सध्याच्या तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांची एरंडोल येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार यांच्याकडे विभागीय कार्यालयातील आस्थापना शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूलचे तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांच्याकडे देवळ्याचा चार्ज देण्यात आला. दरम्यान, इगतपुरीचा पदभार पारोळ्याच्या तहसीलदार वंदना खेरमाळे यांना देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार सी. एस. देशमुख यांची शिरपूरला बदली झाली असून, त्यांच्या जागी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या तहसीलदार रचना पवार यांची नियुक्ती झाली आहे. येवल्याचे तहसीलदार नरेश बहिराम यांची पिंपळनेर साक्री अपर जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दोंडाईचाचे तहसीलदार रोहिदास वारूळे यांची नियुक्ती झाली आहे. बागलाण तहसीलदारपदी प्रमोद हिले यांची नेमणूक करण्यात आली. येत्या डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी होम डिस्ट्रिक्ट आणि पदाची तीन वर्षे पूर्ण केलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या.