Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Nashik › टीडीआरमुळे मनपाचा २,१८८ कोटींचा फायदाच

टीडीआरमुळे मनपाचा २,१८८ कोटींचा फायदाच

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:20PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

प्रीमियम दरवाढीमुळे शेतकर्‍यांबरोबरच मनपा व बिल्डरांचादेखील फायदाच होणार आहे. यामुळे यासंदर्भातील सर्व तांत्रिक बाजू समजून घेत शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे रहावे आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनपाने सादर केलेला प्रीमियम दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, अशी मागणी आ. बाळासाहेब सानप यांच्याकडे शेतकर्‍यांनी सोमवारी (दि.25) केली. दरम्यान, टीडीआरच्या माध्यमातून आरक्षित जमिनी ताब्यात घेऊन मनपाला आजपर्यंत सुमारे 2188 कोटींचा फायदा झाल्याची बाब शेतकर्‍यांनी आ. सानपांच्या निदर्शनास आणून दिली. 

यासंदर्भात शहरातील काही शेतकर्‍यांनी आ. सानप यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शहराकरीता डीपीसीआर अंतर्गत रहिवास वापर आणि औद्योगिक वापराच्या इमारतीकरता प्रीमियम एफएसआयचा दर 40 टक्के व वाणिज्य वापराकरता दर 50 टक्के इतका निश्‍चित करण्यात आलेला आहे. हे दर लागू झाल्यापासून खुल्या बाजारात विकल्या जाणार्‍या टीडीआरचे दर त्यापेक्षा कमी झाल्याने शेतकरी वर्गाचे निम्याहून अधिक रकमेचे नुकसान होत आहे. आजमितीस महानगरपालिकाचे 600 कोटीचे दायित्व प्रलंबित आहे जर अश्या परिस्थितीत आरक्षित जमीनधारकांना कॅश क्रेडिट बॉण्ड दिल्यास हे दायित्व भविष्यात वाढतच जाईल व स्मार्ट सिटीसह विविध विकासकामांना त्यांची खीळ बसेल. 

प्रीमियम एफएसआयमुळे मनपास भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. कारण एका बाजूने मनपा शेतकर्‍यांच्या जागा टीडीआरच्या माध्यमातून ताब्यात घेते व त्याच टीडीआरला बाजारात प्रतिस्पर्धी म्हणून स्वत: बाजार मूल्याच्या 40 टक्के दराने एफएसआय विकते ही बाब मनपासाठी लाभदायी ठरलेल्या टीडीआर संकल्पनेला छेद देणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी नगरसेवक दिलीप दातीर यांच्यासह कुंदन मौले, नानासाहेब विधाते, सोमनाथ बोराडे, वैभव विधाते, सचिन नाठे, सचिन जाधव, संजय पाटील, पंकज दातीर, जयंत अडसरे, प्रकाश शिंदे, माधव केदार, सुभाष नागरे आदी उपस्थित होते.

टीडीआरमुळे मनपाची बचतच

पूर्वी रोख मोबदल्याच्या तुलनेत टीडीआरमधून पैसे मिळत नसल्याने कोणीही टीडीआर घेत नव्हते. मात्र, टीडीआरचे दर हळूहळू वाढत गेल्याने शेतकर्‍यांनी टीडीआर घेण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे मनपास मागील 17 वर्षात 21,88,316 चौ.मी इतके क्षेत्र निधी खर्च न करता ताब्यात घेता आले. त्याची किंमत सुमारे 2,188 कोटी इतकी होत आहे. त्यामुळे मनपास प्रतिवर्ष 129 कोटी रुपयांची बचत होऊन त्यातून विविध कामे करता आली आहे.