Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Nashik › स्वाभिमानी’ नाशिकमध्ये देणार आमदार, खासदारकीचे उमेदवार

स्वाभिमानी’ नाशिकमध्ये देणार आमदार, खासदारकीचे उमेदवार

Published On: Sep 06 2018 3:24PM | Last Updated: Sep 06 2018 3:24PMनाशिक : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात विधानसभेच्या सहा तर लोकसभेची एक जागा लढविणार असल्याचे संकेत खासदार राजू शेट्टी यांनी दिले. 20 ऑगस्ट रोजी खासदार शेट्टी यांचा नाशिक दौरा पार पडला. या दौर्‍यात शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गोपनीय बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली होती.

नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मतदारसंघात स्वाभिमानी भक्‍कमपणे लढू शकते, यावर पहाटेपर्यंत मंथन करण्यात आले. या चर्चेमध्ये निफाड, चांदवड, सिन्‍नर, दिंडोरी, सटाणा, नांदगाव या विधानसभा व नाशिक लोकसभेवर लक्ष केंद्रित करा, येथे आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा, असे आदेश शेट्टी यांनी दिल्याची अधिकृत माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे प्रवक्‍ते संदीप जगताप यांनी दिली.

निफाड हा मुळातच शेतकरी चळवळीचा केंद्र असणारा तालुका आहे. हे ठिकाण सातत्याने प्रस्थापितांना धोबीपछाड करून चमत्कारिक निकाल लावण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षात निफाड तालुक्यात स्वाभिमानीने रानवड कारखाना चालू करण्यासाठी व इतर अनेक प्रश्‍नांसाठी स्वाभिमानीचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले-पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वी संघर्ष केला आहे. त्यामुळे स्वाभिमानीची तेथे चांगली पायाभरणी झाली आहे. हंसराज वडघुले हे बांधकाम विभागातील नोकरी सोडून सातत्याने शेतकर्‍यांसाठी संघर्ष करीत आहे. तसेच, ते निफाड तालुक्यातीलच जळगाव येथील असल्यामुळे त्यांचे नाव सध्या या मतदारसंघासाठी आघाडीवर आहे.

सटाणा मतदारसंघावरही स्वाभिमानीचे लक्ष आहे. तेे सातत्याने स्वाभिमानीचे वरिष्ठ पदाधिकारी दीपक पगार यांच्या नेतृत्वात कांदा, कर्जमाफीसारखे लढे सातत्याने लढले गेले आहे. त्यामुळे पगार हे बाजार समितीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. हा मतदारसंघ राखीव असल्याने पगार विधानसभेसाठी उमेदवार होऊ शकत नसले तरी त्यांच्या नेतृत्वात येथे स्वाभिमानी विजयी होण्याची मोठी अपेक्षा आहे.

नांदगाव मतदारसंघ स्वाभिमानीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. नार-पार योजना  व इतर अनेक विषयांवर स्वाभिमानीने येथे युवा जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव, परशराम शिंदे, नीलेश चव्हाण यांच्या नेतृत्वात रस्त्यावरची लढाई लढली आहे.

चांदवड-देवळा व सिन्‍नर हे दोन मतदारसंघही स्वाभिमानीच्या यादीत आहे. या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानीची तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी जोडली गेली आहे. चांदवडमध्ये डॉ. कुटे, अभय सूर्यवंशी या नव्या पिढीसोबत अनुभवी गोपीनाथ झाल्टे यांच्यासारखी भक्‍कम माणसं आहे तर सिन्‍नरमध्ये आत्माराम पगार, रवी पगार यांच्यासारखे लढाऊ नेतृत्व संघटनेला मिळाले आहे.

दिंडोरी-पेठ हे नाव प्रथमच स्वाभिमानीच्या यादीत समाविष्ट झाले आहे. येथे संदीप जगताप यांच्या रूपाने एक प्रामाणिक, शेतकरी चळवळीशी निगडित व विश्‍वासू चेहरा स्वाभिमानीला मिळाला आहे. खासदार शेट्टी यांनीही संदीप जगताप यांना विश्‍वासाने राज्य प्रवक्‍ता यासारखी महत्वपूर्ण जबाबदारी दिली. मागील वर्षभरात शेट्टी यांनी या तालुक्यात अनेक ठिकाणी येऊन सभा घेतल्या आहेत. राखीव असल्यामुळे जगताप उमेदवार होऊ शकत नसले तरी संघटनेने ठरवल्यास एक नवा चेहरा घेऊन ते दिंडोरीत ताकदीने उतरतील.

नाशिक लोकसभेतदेखील उमेदवार देण्याची स्वाभिमानीची तयारी आहे. नाशिक शहरात ज्या चळवळी होतात त्यात स्वाभिमानीची महत्त्वपूर्ण भूमिका असते.तसेच, ग्रामीण भागात संघटनेला व राजू शेट्टी यांना मानणारा मोठा वर्ग आहे याचा फायदा निश्‍चित होईल, अशी अपेक्षा धरून उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.