होमपेज › Nashik › मनपा उपलेखापालांचे हलगर्जीपणामुळे निलंबन

मनपा उपलेखापालांचे हलगर्जीपणामुळे निलंबन

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 11:10PMनाशिक : प्रतिनिधी 

मनपा आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांचा धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला सुरुच असून, कामात हलगर्जीपणा केल्यामुळे उपलेखापाल तुकाराम मोंढे व पश्‍चिम विभागीय कार्यालयातील उपलेखापाल वंदना तळवे यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, कामात कसूर केल्याने पाच कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

आयुक्‍त मुंढे यांनी पदभार स्विकारल्यानंतर महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना कामकाजात सुधारणा करण्यासाठी 90 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट घरी पाठविण्याची कारवाई केली जाईल, अशी तंबीच त्यांनी दिली होती. 90 दिवसांचा अल्टीमेटम बुधवारी (दि.9) पूर्ण होत आहे. त्यामुळे कुणाची तळी भरणार याचा कर्मचार्‍यांनी धसका घेतला होता. मात्र, अल्टीमेटम पूर्ण होण्याच्या एक दिवस अगोदरच कामात सुधारणा न केल्याने आयुक्‍त मुंढे यांनी दोन उपलेखापालांचे निलबंन केले आहे. त्यामध्ये तुकाराम मोंढे व वंदना तळवे  यांचा समावेश आहे. उपलेखापाल तुकाराम मोंढे हे ऑगस्ट 2011 पासून सेवेत कार्यरत आहे. त्यांच्याकडे अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी सन 2011 ते 2015 या कालावधीत अनेक अभिलेखे तयार केले नाही. तसेच जे काही अभिलेखे तयार केले त्यात अनेक चुका होत्या. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने 31 आक्टोबर 2015 रोजी त्यांच्या तीन वेतनवाढ बंद आणि गैरहजेरीबाबत अवैतनिक वेतन करण्याची शास्ती लावली होती. प्रशासनाच्या कारवाईविरुध्द मोंढे यांनी स्थायी समितीकडे अपिल केले होते.

स्थायीने मोंढे यांच्याविरुध्द केलेली शिक्षा रद्द करण्यासंदर्भात ठराव पारित केला होता. त्यावर प्रशासनाने शासनाकडे संबंधित ठराव विखंडीत करण्यासाठी पाठविला होता. शासनाने हा ठराव विखंडीत केला होता. या प्रकारानंतर आता प्रशासनाने मोंंढे यांच्यावर कर्तव्यात कसुरीचा ठपका ठेवत निलबंनाची कारवाई केली. तर, उपलेखापाल वंदना तळवे यांनीदेखील कामात कसूर केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आयुक्तांनी कामकाजात सुधारणा करण्यासाठी दिलेला 90 दिवसांचा अल्टीमेटम संपुष्टात येत असल्याने कोणावर कारवाईचा बडगा उगारला जाणार या भितीने अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये धास्ती पहायला मिळत आहे.