Fri, Apr 19, 2019 12:20होमपेज › Nashik › पोलीस कोठडीत संशयिताची आत्महत्या

पोलीस कोठडीत संशयिताची आत्महत्या

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:28AMसिन्‍नर : प्रतिनिधी

सिन्‍नर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.25) दुपारी 3.45 च्या सुमारास उघडकीस आली. सोन्या ऊर्फ डीचक दौलत जाधव (21, रा. जोशीवाडी, सिन्‍नर) असे मृताचे नाव आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, जोशीवाडीत तणाव पसरला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जाधव याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोन्या जाधव याला विनयभंगाच्या गुन्ह्यात काल दुपारी 3.19 मिनिटांनी मेडिकल चेकअप करून अटक केली होती. तथापि, 3.45 च्या सुमारास त्याने पोलीस कोठडीतील शौचालयाच्या वरील खिडकीस चिंध्यांच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब उघड झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी त्याच्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. पोलीस अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे    पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. निफाडचे प्रांताधिकारी महेश पाटील, नायब तहसीलदार, प्रशांत पाटील यांच्यासह मृत सोन्या जाधव याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. दरम्यान, शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळे येथील मेडीकल कॉलेमध्ये पाठविण्यात येणार असून या घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी आमच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात नाहक गोवले असल्याचा आरोप सोन्या जाधव याच्या नातेवाईकांनी केला आहे. तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिस ठाणे परिसरात केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

सोन्या जाधववर यापूर्वी दोन गुन्हे ः कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केलेला संशयित सोन्या उर्फ डीचक जाधव याच्यावर यापुर्वी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 2016 मध्ये त्याच्यावर भादंवि कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होत्या.