Wed, Feb 19, 2020 10:52होमपेज › Nashik › नाशिक : अनधिकृत बांधकामांचे नगररचना विभागाकडून सर्वेक्षण

नाशिक : अनधिकृत बांधकामांचे नगररचना विभागाकडून सर्वेक्षण

Published On: Dec 02 2017 4:09PM | Last Updated: Dec 02 2017 4:06PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शहरासह परिसरातील लॉन्स, मंगल कार्यालयांसह सर्व प्रकारच्या व्यावसायिक इमारतींच्या सर्वेक्षणाचे काम नगररचना विभागाने हाती घेतले आहे. यासाठी सहाही विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून आठ दिवसात संबंधितांना नोटीस सादर करण्यात येणार आहे. 

दरम्यान, आडगाव नाका येथील स्वामी नारायण मंदिर ट्रस्टने अनधिकृत भव्यदिव्य देखावा उभारल्याप्रकरणी देखील नगररचना विभाग नोटीस बजावणार आहे. महापौर रंजना भानसी तसेच नगरसेवक अरूण पवार यांनी प्रभाग क्रमांक १  मधील दिंडोरीरोडवरील अभिषेक प्लाझासह काही इमारतींची पाहणी करत अनधिकृत बांधकामे व संबंधित ठिकाणी गैरवापर होत असल्याचे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या मनपाच्या नगररचना विभागाने शहरातील अशा प्रकारच्या इमारतींची बांधकामे तपासण्याची मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी सर्वच कनिष्ठ अभियंत्यांना सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यचे आदेश दिले आहेत. 

महापौर भानसी यांनी देखील अशा स्वरुपाचे आदेश आठ दिवसांपूर्वी दिले होते. नुसार दिडोरीरोडवरील 70 लॉन्स व मंगल कार्यालय असलेल्या मिळकतधारकांना नोटीस  काढण्यात आली असून, औरंगाबादरोडवरील मंगल कार्यालयांची पाहणी करून संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांनी दिली. शहरातील अनेक इमारतींमधील पार्किंगच्या जागेत व्यावसायिक वापर सुरू केला आहे. यामुळे पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहने रस्त्यावरच लावली जात असल्याने अपघातांचे आणि वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. इमारतींचा अशा प्रकारे गैरवापर सुरू असल्याने मनपाच्या महसुलावरही पाणी फिरत आहे.

सहाही विभागातील इमारती व बांधकामांच्या सर्वेक्षणाचे आदेश कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आले आहे. आठ दिवसात हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावली जाईल. त्यानंतर दिलेल्या कालावधीत योग्य ती कागदपत्रे सादर न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. स्वामी नारायण मंदिर ट्रस्टलाही नोटीस बजावण्यात येणार आहे. असे पी. बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता नगररचना विभाग यांनी सांगितले.