Wed, May 22, 2019 21:06होमपेज › Nashik › कुपोषणमुक्‍तीसाठी सर्वेक्षण महत्त्वपूर्ण घटक 

कुपोषणमुक्‍तीसाठी सर्वेक्षण महत्त्वपूर्ण घटक 

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 11:34PMनाशिक : प्रतिनिधी  

जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनखाली महिला व बालविकास आरोग्य व ग्रामपंचायत विभाग यासाठी काम करीत आहेत. जिल्ह्यातील एकही मूल कुपोषित राहणार नाही, ग्रामबालविकास केंद्रातून आहार व उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे. गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, ग्रामसेवक यांनी केलेले सर्वेक्षण महत्त्वपूर्ण असून, त्याद्वारे कुपोषित बालक शोधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी केले.नाशिक व दिंडोरी तालुक्याची एकत्रित आढावा बैठक शनिवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सभागृहात पार पडली. त्याप्रसंगी लांडगे बोलत होते. 

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी दत्तात्रय मुंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी ईशाधिन शेळकंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गर्जे आदी उपस्थित होते. 

लांडगे यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेताना अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुंडे यांनी कुपोषण निर्मूलनासाठी उपयुक्‍त ग्रामबालविकास केंद्राबाबत आढावा घेण्यात आला. आरोग्य व आहारसंहितेनुसार आहार व औषध देण्यात येत आहेत की नाही याबाबत सर्व संबंधितांकडून माहिती घेण्यात आली. दिंडोरी तालुक्यात पुन्हा सर्वेक्षण करून सर्व तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामबालविकास केंद्रांना नियमित भेटी देण्याचे आदेश दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेताना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले.  

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. नाशिक तालुक्याने घरकुल कामात प्रगती केली असून, राज्यात पहिल्या दहामध्ये नाशिक तालुका असल्याबाबत तालुक्याचे अभिनंदन केले. यावेळी सिंचन विहीर,  पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायतीमधील जनसुविधेची कामे, घरकुल आदी योजनांची अपूर्ण बांधकामे विहीत मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश अनिल लांडगे यांनी दिले.

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला. नाशिक पंचायत समितीतील सहायक प्रशासन अधिकारी आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांना पेन्शन दाखला देण्यात आला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना अपूर्ण योजना त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, समाजकल्याण विभागाचे नीलेश पाटील, अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, नाशिक तालुक्याचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, दिंडोरीचे गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, जिल्हा व तालुकास्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.