Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Nashik › सुरेश वाडकर जमीन गैरव्यवहार प्रकरण 

बड्या बिल्डरसह चार जणांविरोधात धमकीची तक्रार

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 11:51PMनाशिकरोड : वार्ताहर

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, सोनू निगम यांच्याविरोधात दाखल केलेला जमीन गैरव्यवहाराचा न्यायालयीन खटला मागे घ्यावा, अन्यथा कुटुंबासह अपहरण करण्याची फिर्यादीला धमकी दिल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत धमकी देणार्‍यांमध्ये जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्‍तींचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नाशिकमधील बड्या बिल्डरसह चार जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. यामुळे काही वर्षांपासून गाजत असलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाला  वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

अकबर इस्माईल शेख (54, हरिकुंज सोसायटी, रामदास नगर, टाकळी रोड) असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, नाशिकरोड परिसरातील देवळाली गाव हद्दीतील सर्व्हे नं. 7/13 अ, एकूण क्षेत्र 66 आर आहे. जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर, विजया नीळकंठ करंदीकर, संतोष श्यामराव जाधव यांच्याकडून विष्णू रामचंद्र शिंदे यांच्या संमतीने 17 फेब्रुवारी 2007 रोजी जागेचा रजिस्टर मुखत्यार पत्र आणि डेव्हलपमेंट अ‍ॅग्रिमेंट करारनामा केलेला होता.

मात्र 20 फेब्रुवारी 2008 रोजी सुधीर सुनील बोडके, राजेश प्रभाकर दरगोडे, यांनी विनायक विष्णू धोपावकर, विजया नीळकंठ करंदीकर यांच्याकडून सदरील मिळकतीचे रजिस्टर खरेदी खत अवघ्या तीन लाख रुपयांमध्ये करून घेतले. त्याचप्रमाणे 16 एप्रिल 2008 रोजी सुरेश ईश्‍वर वाडकर, सोनू निगम, हेमंत कोठीकर यांच्यासोबत 15 कोटी आठ लाख रुपयांना व्यवहार करून सहा कोटी रुपये घेतले. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार अकबर शेख यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. याप्रमाणे 6 मे 2008 रोजी न्यायालयाने मिळकतीच्या खरेदी विक्रीवर स्थगती दिली. न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने सद्यस्थितीत मिळकतीचे सर्व व्यवहार बंद आहेत.

रिव्हॉल्व्हर दाखविला ः अकबर शेख यांना 8 मे रोजी सुधीर सुनील बोडके, प्रदीप पंढरीनाथ बोरसे यांनी त्यांच्या टाकळी रोडवरील घरासमोर अडवून शेख यांना शिवीगाळ करीत रिव्हॉल्व्हर दाखवून तू दहा वर्षांपासून दावा दाखल केला आहे. तो काढून घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्ररीत म्हटले आहे. 

सत्तर लाखांचे आमिष ः सुधीर सुनील बोडके यांनी 2 ऑक्टो. 2017 रोजी अकबर शेख यांना हॉटेल कामत येथे बोलवून दावा काढून घेतल्यास तुला 70 लाख रुपये देण्याचे आमिष दाखविल्याचेही म्हटले आहे. तसेच त्यावेळी बोडके यांच्यासोबत प्रमोद भालेकर, इलियाज शेख, यतीन कुलकर्णी असल्याचा तक्रारीत म्हटले आहे. तसेच नेमीचंद ललितप्रसाद पोद्दार आणि विपुल नेमीचंद पोद्दार यांनी 2 जुन 2018 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारला रामदास स्वामी नगर येथे अकबर शेख यांना घरी जात असताना अडवून दिवाणी न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी अपहरण करण्याची धमकी दिल्याचेही म्हटले.

अकबर शेख यांना धमकविण्यात आलेल्या तक्रारीबाबत संशयितांना अद्याप अटक केलेली नाही. यासंदर्भात चौकशी केली जात आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सर्व कायदेशीर बाजू तपासूण निर्णय घेतला जाईल. - प्रभाकर रायते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनगर, नाशिक

आपल्यावर अपरहरणाची धमकी दिल्याची तक्रार खोटी असून पोलिसांनी याबाबत मोबाईल लोकेशन तपासून यामागील सत्य काय ते समोर आणून कारवाई करावी  - नेमीचंद पोद्दार, बांधकाम व्यावसायिक, नाशिक